Spread the love

जल जीवन मिशनच्या कजगाव पाणीपुरवठा योजनेवर प्रश्नचिन्ह

संयुक्त चौकशी होऊनही कारवाई प्रलंबित; दि. ८ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

भडगाव, ता. प्रतिनिधी : गणेश रावळ

भडगाव तालुक्यातील कजगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील कथित तांत्रिक त्रुटी, निकृष्ट व अपूर्ण काम तसेच मंजूर काम आणि प्रत्यक्ष कामातील तफावत यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक मधुकर सोनवणे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तक्रारीनंतर संयुक्त चौकशी होऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यवाहीचे निर्देश दिले असतानाही अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे.

सोनवणे यांनी दि. ४ मार्च २०२६ रोजी संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दि. २४ जून २०२६ रोजी या प्रकरणाची संयुक्त चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान पाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइनची कमी-जास्त खोली, पाइपलाइन रस्त्यालगत असल्यामुळे होणारे नुकसान, पंपहाऊसचे अपूर्ण काम तसेच सावदे-गिरणा नदीपात्रातील पाइपलाइन वाहून जाणे, मंजूर तांत्रिक बाबी आणि प्रत्यक्ष कामातील तफावत आदी मुद्द्यांची नोंद झाल्याचे सोनवणे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, नाशिक येथील मुख्य अभियंत्यांनी दि. १० जुलै २०२६ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तक्रारीतील मुद्द्यांच्या अनुषंगाने स्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदारास देण्याचेही निर्देश देण्यात आले होते.

मात्र, तक्रार, संयुक्त चौकशी आणि वरिष्ठ स्तरावरील निर्देशांनंतरही संबंधित ठेकेदार, अभियंते अथवा जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून अंतिम कार्यवाही झाल्याची स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नसल्याचे सोनवणे यांचे म्हणणे आहे.

यापूर्वी दि. १६ जुलै २०२६ रोजी सोनवणे यांनी प्रशासनाला १५ दिवसांची पूर्वसूचना देत कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पूर्वसूचनेनंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने आता दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे शांततापूर्ण व कायदेशीर मार्गाने आमरण उपोषण करण्याची अंतिम पूर्वसूचना त्यांनी दिली आहे.

“पाठपुरावा वैयक्तिक नसून सार्वजनिक हितासाठी”

पुंडलिक मधुकर सोनवणे यांनी सांगितले की, गावातील सार्वजनिक विकासकामांमध्ये पारदर्शकता राहावी, शासनाच्या निधीचा योग्य वापर व्हावा, कामाची गुणवत्ता टिकून राहावी आणि नागरिकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. हा पाठपुरावा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध वैयक्तिक स्वरूपाचा नसून सार्वजनिक हित आणि प्रशासनाचे उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चौकशी अहवालावर अंतिम निर्णयाची मागणी

सोनवणे यांनी प्रशासनाकडे संयुक्त चौकशी अहवालाचे परीक्षण करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, मंजूर तांत्रिक मंजुरी आणि प्रत्यक्ष कामाची तुलनात्मक तपासणी करावी, दोषपूर्ण अथवा अपूर्ण काम नियमानुसार पूर्ण करून घ्यावे, शासन निधीचे नुकसान झाले असल्यास नियमानुसार वसुली करावी तसेच संपूर्ण कार्यवाहीचा कारणांसहित लेखी अहवाल तक्रारदारास द्यावा, अशा मागण्या केल्या आहेत.

“चौकशी अहवाल तयार होणे ही प्रक्रिया आहे; मात्र त्या अहवालावर निष्पक्ष आणि कारणांसहित अंतिम निर्णय होणे हेच प्रशासनाचे खरे उत्तरदायित्व आहे. त्यामुळे दि. ८ सप्टेंबरपूर्वी प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी, अन्यथा शांततापूर्ण मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल,” अशी भूमिका पुंडलिक मधुकर सोनवणे यांनी घेतली आहे.

या प्रकरणात प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि संयुक्त चौकशी अहवालावर कोणती कार्यवाही केली जाते, याकडे कजगाव परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version