स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नांवर ६ सप्टेंबरला पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक
मार्जिन मनी, लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा, ५८ पानी शासन निर्णय व वाहतूक कंत्राटाच्या प्रश्नांवर होणार चर्चा
भुसावळ : प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता नेमाने फार्म हाऊस, पुणे-सोलापूर रोड, श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर, उरळी कांचन, पुणे येथे ही बैठक होणार आहे.
या बैठकीस राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून जळगाव जिल्ह्यातून सुमारे २०० ते ३०० रास्त भाव दुकानदार व पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुणे जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटना, तालुका हवेली यांच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रमुख मार्गदर्शक काकासाहेब देशमुख राहणार आहेत. तसेच ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर फेडरेशन, नवी दिल्लीचे प्रतिनिधी, डी. एन. पाटील, राज्य संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत यादव, जनरल सेक्रेटरी राजेश अंबुसकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष तसेच राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मार्जिन मनीसह विविध प्रश्नांवर चर्चा
स्वस्त धान्य दुकानदारांच्या मार्जिन मनीचा प्रश्न तातडीने सोडविणे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे, तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंदर्भातील ५८ पानी प्रलंबित शासन निर्णय तातडीने जाहीर करणे, या प्रमुख विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.
याशिवाय राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांना वाहतूक कंत्राटाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी, ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर फेडरेशनच्या केंद्रीय कमिटीच्या बैठकीतील निर्णयांचा आढावा तसेच विविध मागण्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबतही बैठकीत विचारविनिमय करण्यात येणार आहे.
या बैठकीस पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष तसेच जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भुसावळ तालुका अध्यक्ष महेंद्र सपकाळे, जिल्हा सचिव अंभोरे आणि जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कैलास उपाध्याय यांनी केले आहे.
