Spread the love

धुळ्यात मराठा समाजाकडून सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

मागण्या मान्य करण्याची मागणी; ‘न्याय दिल्यास डोक्यावर घेऊन गुलाल उधळू, अन्यथा अंत्ययात्रेवरच’ असा इशारा

धुळे : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धुळ्यात मराठा समाजाच्या वतीने सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाने आपला संताप व्यक्त केला.

आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला सुरुवात झाली. दरम्यान, खंडेराव मंदिराजवळ पोलिसांनी ही अंत्ययात्रा रोखली. यावेळी मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मागण्या मान्य करण्याची मागणी

मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शासनाने मागण्या मान्य करून न्याय दिल्यास सरकारला डोक्यावर घेऊन गुलाल उधळू; मात्र मागण्या मान्य न झाल्यास सरकारच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेवरच गुलाल उधळण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

गेल्या सात दिवसांपासून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. शासनाकडून यापूर्वीही मराठा समाजाला आश्वासने देण्यात आली; मात्र त्यांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांकडून आंदोलन रोखण्याचा प्रयत्न

प्रतिकात्मक अंत्ययात्रा मार्गावर पोलिसांनी हस्तक्षेप करत ती खंडेराव मंदिराजवळ रोखली. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.

या आंदोलनात भानुदास बगदे, विनोद जगताप, दीपक रौंदळ, श्रीरंग जाधव, विकास बाबर, ॲड. दिनेश काळे, भैय्या शिंदे, राकेश भोसले, वीरेंद्र मोरे, अण्णा कदम, संतोष लकडे, सुरेश पवार यांच्यासह मराठा समाजातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version