Spread the love

एमआयएमकडून जनतेची दिशाभूल? शहर विकास आघाडीचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

शिवसेना नगरसेवक धीरज कलंत्री यांचा दावा; संख्याबळ आमच्याकडे अधिक असल्याचा केला दावा

धुळे : प्रतिनिधी

धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटला असून एमआयएमकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक तथा शहर विकास आघाडीचे धीरज कलंत्री यांनी केला आहे. न्यायालयाने केवळ चार आठवड्यांच्या कालावधीत विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशात एमआयएमच्या नगरसेवकाची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याबाबत कुठेही नमूद नसल्याचा दावा कलंत्री यांनी केला.

शहर विकास आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक संख्याबळ अधिक असल्याचे सांगत या पदावर आमचाच दावा असल्याचे कलंत्री यांनी स्पष्ट केले. निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेतेपदावरून रस्सीखेच

धुळे महानगरपालिकेची निवडणूक होऊन सुमारे आठ महिने उलटले आहेत. मात्र, विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न अद्याप कायम असून एमआयएम आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या गटामध्ये या पदावरून संघर्ष सुरू आहे.

शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असल्याचा दावा करण्यात येत असून, संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेतेपदावर आपला हक्क असल्याचे आघाडीचे म्हणणे आहे. दुसरीकडे एमआयएमकडूनही या पदावर दावा करण्यात येत असल्याने महानगरपालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर हालचालींना वेग

विरोधी पक्षनेतेपदाबाबत न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनासमोर आता निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान आहे. न्यायालयाच्या आदेशाचा नेमका अर्थ आणि महापालिकेतील गटांचे संख्याबळ यावरून दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत.

त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची निवड कोणाच्या बाजूने जाते, याकडे धुळे महानगरपालिका वर्तुळासह शहरातील राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version