भरधाव कंटेनर पुलाचे कठडे तोडून थेट खाली कोसळला; दुचाकीस्वार गंभीर जखमी
धुळ्यातील वडजाई रोडवरील घटना; प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप
धुळे : प्रतिनिधी
धुळ्यात वडजाई रोड परिसरात भरधाव कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलाचे कठडे तोडून थेट खाली रस्त्यावर कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या अपघातात कंटेनरची धडक एका दुचाकीस्वाराला बसल्याने तो गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातून बंगळुरूकडे कंपनीच्या नवीन कार घेऊन जाणारा कंटेनर वडजाई रोड परिसरातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनरने पुलाचे कठडे तोडत थेट खाली असलेल्या रस्त्यावर कोसळला. यावेळी कंटेनरची धडक दुचाकीस्वाराला बसली.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
शुक्रवार असल्याने वडजाई रोड परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने नमाज पठणासाठी गेले होते. त्यामुळे या परिसरात नेहमीच्या तुलनेत गर्दी कमी होती. परिणामी मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
चालक मद्यधुंद असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा आरोप
दरम्यान, कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. मात्र, चालकाने मद्यप्राशन केले होते की नाही, हे वैद्यकीय तपासणी व पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या अपघाताचा अधिक तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून वाहनावरील नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास केला जात आहे.
बाईट : सलमान अन्सारी — प्रत्यक्षदर्शी
