धुळ्यात एमआयएमचा विरोधी पक्षनेता होणार? न्यायालयाचा मनपाला चार आठवड्यांत निर्णय घेण्याचा आदेश
गुणवत्तेच्या आधारे विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याचे निर्देश; एमआयएमचा न्यायालयीन लढ्याला यश
धुळे : धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा आता न्यायालयाच्या आदेशामुळे निर्णायक वळणावर आला आहे. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मनपा प्रशासनाला गुणवत्तेच्या आधारे विरोधी पक्षनेतेपदाची निवड चार आठवड्यांच्या आत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे धुळे मनपात एमआयएमला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धुळे महानगरपालिकेची निवडणूक होऊन तब्बल आठ महिन्यांचा कालावधी उलटला, तरी विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नव्हती. याविरोधात एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत विरोधी पक्षनेतेपदासाठी न्यायालयीन दाद मागितली होती. अखेर न्यायालयाने मनपा प्रशासनाला चार आठवड्यांत गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याने एमआयएमच्या भूमिकेला बळ मिळाले आहे.
जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापना केली. या निवडणुकीत एमआयएमनेही १० जागा जिंकत मनपातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले. त्यामुळे एमआयएमने महापौरांकडे विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करणारे पत्र दिले होते.
मात्र निवडणुकीनंतर अनेक महिने उलटूनही विरोधी पक्षनेत्याची निवड न झाल्याने एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. गुणवत्तेच्या आधारे विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेण्याची मागणी पक्षाकडून करण्यात आली होती.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर आता मनपा प्रशासन आणि महापौर याबाबत काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कायदेशीर बाबींचा विचार करून एमआयएमच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या दाव्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी एमआयएमचे इर्शाद जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत केली.
न्यायालयाच्या आदेशामुळे एमआयएमच्या दाव्याला मोठे बळ मिळाले असले, तरी अंतिम निर्णय मनपा प्रशासनाने गुणवत्तेच्या आधारे घ्यायचा आहे. त्यामुळे आगामी चार आठवडे धुळे महानगरपालिकेच्या राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
