फर्दापूर व जगला तांडा शिवाराची आमदार अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी
कमी पावसामुळे कापूस, मका व सोयाबीनचे मोठे नुकसान; तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याचे निर्देश
सोयगाव, दि. ४ ऑगस्ट २०२६ (प्रतिनिधी – शिवराम जाधव) : सोयगाव तालुक्यातील फर्दापूर तांडा आणि जगला तांडा परिसरात कमी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस, मका आणि सोयाबीन या प्रमुख पिकांना फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवारांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांकडून पिकांचे नुकसान, पावसाची स्थिती आणि निर्माण झालेल्या अडचणींची माहिती जाणून घेतली. सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील शेती पिकांच्या परिस्थितीचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
पाहणीदरम्यान कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सेवक, तलाठी तसेच महसूल विभागाचे पथक उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांकडूनही आमदारांनी पीक परिस्थितीची माहिती घेतली.
तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश
कमी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी आमदारांकडे केली. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाच्या निकषांनुसार मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, अशी भूमिका आमदारांनी यावेळी व्यक्त केली.
कमी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा असून, आता प्रशासनाकडून पंचनामे आणि पुढील कार्यवाही किती वेगाने केली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
