Spread the love

अंजाळेच्या नूतन विद्या मंदिरात गणपती मूर्ती कार्यशाळा व दहीहंडी उत्साहात

विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; भारतीय संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

भुसावळ प्रतिनिधी | अंजाळे : येथील नूतन विद्या मंदिर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, पर्यावरण संवर्धन तसेच पारंपरिक सणांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने गणपती मूर्ती कार्यशाळा आणि दहीहंडी उत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नीलिमा झोपे यांनी केले. हरितसेना शिक्षक लिलाधर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र धांडे व सुनील सोनवणे यांच्या सहकार्याने गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्वतःच्या हाताने साकारल्या. मातीपासून मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

यानंतर शाळेच्या परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत वातावरणात चैतन्य निर्माण केले.

यावेळी श्रीमती ज्योती परखड, मनोज चौधरी, पराग चौधरी, यश चौधरी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्कृतीसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश

गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळा आणि दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख, पारंपरिक सणांचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव करून देण्यात आली. सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा सुंदर संगम ठरलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांच्या योगदानामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version