महात्मा फुले हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात; दहावीच्या विद्यार्थ्यांनी सांभाळला शाळेचा कारभार
विद्यार्थिनी मुख्याध्यापिका मयुरी भोई व पर्यवेक्षक श्वेता भोई यांना महात्मा फुले-सावित्रीमाईंचे ग्रंथ भेट; शाळेला फोटोफ्रेमही प्रदान
धरणगाव प्रतिनिधी – वाल्मिक पाटील
धरणगाव : शहरातील सुवर्णमहोत्सवी महात्मा फुले हायस्कूल येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी शाळेचा संपूर्ण कारभार सांभाळला. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका तसेच सेवक अशा विविध भूमिका विद्यार्थ्यांनी जबाबदारीने पार पाडत प्रत्यक्ष शालेय व्यवस्थापनाचा अनुभव घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जया सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थिनी मुख्याध्यापिका कु. मयुरी भोई होत्या. विद्यार्थिनी पर्यवेक्षक श्वेता भोई आणि प्रमुख अतिथी शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेला महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांची आकर्षक फोटोफ्रेम भेट देण्यात आली.
मयुरी भोई व श्वेता भोई यांना महापुरुषांचे ग्रंथ भेट
शिक्षक दिनाचे औचित्य साधून पी. डी. पाटील यांच्याकडून विद्यार्थिनी मुख्याध्यापिका कु. मयुरी भोई व पर्यवेक्षक श्वेता भोई यांना महात्मा फुले लिखित ‘ब्राह्मणांचे कसब’ तसेच ‘सावित्रीमाई फुले’ हे अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले.
यानंतर जया सोनवणे व श्वेता भोई यांनी महात्मा फुले, सावित्रीमाई फुले व इतर महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार व पी. डी. पाटील यांनी महापुरुषांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले.
विद्यार्थ्यांनी व्यक्त केला शाळा चालविण्याचा अनुभव
एका दिवसासाठी विद्यार्थी-शिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या दिपाली भोई, डिगंबर कुंभार, राकेश केदार, मानव करोसिया, भूमिका चंडाले, रामेश्वरी चंडाले तसेच विद्यार्थी सेवक घनश्याम भिल, शुभम मोरे, करण भिल आणि ज्ञानेश्वर भिल यांनी शाळा चालविण्याचा अनुभव कथन करून मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मयुरी भोई यांनी एका दिवसासाठी मुख्याध्यापक म्हणून काम करण्याचे महत्त्व सांगितले. दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेचा कारभार प्रत्यक्ष हाताळण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याध्यापक जे. एस. पवार यांचे विद्यार्थ्यांनी आभार मानले.
ग्रंथपाल गोपाल महाजन यांचा वाढदिवसही साजरा
शाळेचे ग्रंथपाल गोपाल महाजन यांच्या जन्मदिनानिमित्त मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या भोई व मानव करोसिया यांनी केले, तर जया सोनवणे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका प्रत्यक्ष पार पाडल्याने शिक्षक दिनाचा हा उपक्रम अनुभवाधारित शिक्षण, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरला.
