Spread the love

उपवर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरात हजारोंचा एल्गार

सकल बौद्ध समाजाचा विराट मोर्चा; ‘आरक्षण अबाधित ठेवा’ची तहसीलदारांकडे मागणी — परिवर्तन चौकात पथनाट्यातून जनजागृती

मुक्ताईनगर प्रतिनिधी : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील सकल बौद्ध समाजाच्या वतीने शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी शहरात विराट मोर्चा काढण्यात आला. महिला, पुरुष, युवक-युवती तसेच अबालवृद्धांचा मोठा सहभाग असल्याने शहरातील वातावरण निळ्या ध्वजांनी आणि घोषणांनी भारावून गेले होते. ‘आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

कृषी उत्पन्न बाजार समिती, बोदवड रोड येथून दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. बोदवड चौफुली आणि बसस्थानक मार्गे मोर्चा परिवर्तन चौकात पोहोचला. सहभागी समाजबांधवांनी पांढरे वस्त्र परिधान करून गळ्यात निळे रुमाल आणि हातात निळे ध्वज घेतले होते. त्यामुळे मोर्चाचा संपूर्ण परिसर निळ्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

परिवर्तन चौकात महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत समाजबांधवांनी त्रिसरण व पंचशील ग्रहण केले.

सुनील पवार यांचे सविस्तर मार्गदर्शन

मोर्चानंतर परिवर्तन चौकात आयोजित सभेत मालेगाव येथून आलेले प्रमुख वक्ते सुनील पवार यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमुळे अनुसूचित जातींमधील विविध घटकांच्या संविधानिक आरक्षणाच्या हक्कांवर होणारे संभाव्य परिणाम, सामाजिक व शैक्षणिक परिणाम तसेच या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज यावर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यानंतर युवक-युवतींनी पथनाट्याच्या माध्यमातून आरक्षणाचा प्रश्न आणि सामाजिक वास्तव प्रभावीपणे मांडले. पथनाट्याला उपस्थित समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

मोर्चाच्या वतीने तहसीलदार गिरीश वखारे यांच्याकडे निवेदन साद करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ उपस्थित होते. हे निवेदन तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ स्थगित करून रद्द करावी, तसेच उपवर्गीकरणाचा विविध घटकांवर होणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय परिणामांचा सखोल अभ्यास करावा, अशी मागणी करण्यात आली. अनुसूचित जातींच्या संविधानिक आरक्षणाच्या हक्काला बाधा पोहोचेल, अशी कोणतीही कार्यवाही करू नये, अशी भूमिका मांडण्यात आली.

याशिवाय अनुसूचित जातींच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी करावी, नवीन विकासात्मक योजना सुरू कराव्यात तसेच विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

युवक, महिला, उद्योजक आणि बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार व उद्योगाच्या विशेष योजना राबवाव्यात. अनुसूचित जातींच्या वस्त्यांमध्ये रस्ते, पाणी, वीज, निवास आणि आरोग्य या मूलभूत सुविधांचा प्राधान्याने विकास करावा. रमाई आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ द्यावा तसेच सामाजिक न्याय विभागाचा विकास निधी इतरत्र वळवू नये, अशा विविध मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या.

चोख पोलीस बंदोबस्त; वाहतूक सुरळीत

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चादरम्यान कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याने मोर्चाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली नाही. त्यामुळे हजारोंच्या सहभागाचा हा मोर्चा शांततेत, शिस्तबद्ध वातावरणात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version