चौगाव किल्ल्याचे एक हजार वर्षांनंतर होणार संयुक्त सर्वेक्षण!
आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्राची दखल; पुरातत्व, वन, महसूल व भूमी अभिलेख विभागाकडून पाहणी
चोपडा प्रतिनिधी – राहुल पाटील
जळगाव : चोपडा तालुक्यातील मौजे चौगाव येथील पुरातन ऐतिहासिक चौगाव (विजयगड) किल्ल्याचा राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीत समावेश करण्याच्या मागणीला आता गती मिळाली आहे. आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी याबाबत ६ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित कार्यालयाकडे पत्राद्वारे मागणी केली होती. या पत्राची दखल घेत आता चौगाव किल्ल्याचे पुरातत्व, वन, महसूल आणि भूमी अभिलेख विभागामार्फत संयुक्त सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
चौगाव किल्ल्याच्या परिसरात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहनकालीन वारशाच्या खुणा व लेणी असल्याचे आमदार सोनवणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. किल्ल्याच्या परिसरात नैसर्गिक लेणी, पाण्याच्या टाक्या, पुरातन नंदीचे हेमाडपंथी मंदिराचे अवशेष, सप्ततलाव समूह, गवळीवाड्यातील खोल्या तसेच पुरातन आई भवानी मंदिर आढळते.
भव्य तटबंदी, बुरुज आणि भुयारी मार्गामुळे ऐतिहासिक महत्त्व
चौगाव किल्ल्याची भव्य व मजबूत तटबंदी, दोन प्रवेशद्वारे, अनेक बुरुज तसेच भुयारी मार्ग यामुळे या गडाला ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या विशेष महत्त्व असल्याचे आमदार सोनवणे यांनी म्हटले आहे. किल्ल्यालगतच्या त्रिवेणी संगम परिसरात श्री महादेव मंदिर, उत्तर मराठा राजवटीशी संबंधित अवशेष तसेच अन्य ऐतिहासिक वास्तूंच्या खुणाही आढळतात.
चौगाव किल्ल्याचा उल्लेख ब्रिटिशकालीन राजपत्रांमध्ये १८१८ ते १८८० या कालखंडात तसेच महाराष्ट्र राज्याच्या जळगाव गॅझेटमध्ये असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी
जिल्ह्यातील असंरक्षित ऐतिहासिक स्मारकांचे सर्वेक्षण करून त्यांचा राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीत समावेश करण्याचे आदेश ७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महावारसा समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तात नमूद असल्याने चौगाव किल्ल्याचाही या प्रक्रियेत समावेश करावा, अशी मागणी आमदार सोनवणे यांनी केली होती.
चौगाव किल्ला यावल वनविभागातील चोपडा तालुक्यातील कक्ष क्रमांक २५८ मध्ये येतो. वन विभागाच्या हद्दीतील सालेर, मुल्हेर व वासोटा किल्ल्यांच्या धर्तीवर चौगाव किल्ल्यालाही राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
महसुली माहिती प्राप्त; आता संयुक्त सर्वेक्षण
आमदारांच्या पत्राची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक सौरिष सहाय्य आणि नाशिक विभागीय पुरातत्व अधिकारी अमोल गोटे यांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले.
त्यानुसार नाशिक विभागीय पुरातत्व अधिकारी अमोल गोटे यांनी अधीक्षक भूमी अभिलेख, चोपडा, तहसीलदार चोपडा आणि वनक्षेत्रपाल चोपडा यांच्याकडून चौगाव किल्ल्याची महसुली माहिती मागविली होती. ही माहिती गेल्या आठवड्यातच नाशिक विभागीय पुरातत्व कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.
आता प्राप्त माहितीची तपासणी करून वन विभाग, पुरातत्व विभाग, महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभाग, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने चौगाव किल्ल्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणानंतर चौगाव किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
किल्ल्याच्या विकासासाठी दोन कोटींचा निधी
चौगाव किल्ल्याच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णय क्रमांक टिडीएस-२०२५/१०/प्र.क्र.१७१/पर्यटन-१, दि. २८ ऑक्टोबर २०२५ अन्वये दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी नुकताच यावल वन विभाग, जळगाव या यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला आहे.
ऐतिहासिक वारसा, पुरातन वास्तू आणि नैसर्गिक संपदेने समृद्ध असलेल्या चौगाव (विजयगड) किल्ल्याच्या संवर्धनाला आता शासकीय प्रक्रियेमुळे चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्याच्या दिशेने होणाऱ्या आगामी संयुक्त सर्वेक्षणाकडे इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
