Spread the love

‘सर-मॅडम’ची भूमिका दहावीकरांच्या हाती; आदर्श विद्यालयात अनोख्या शिक्षक दिनाची पर्वणी

एका दिवसासाठी विद्यार्थ्यांनी सांभाळला संपूर्ण शैक्षणिक कारभार; अध्यापनातून आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि जबाबदारीची घेतली अनुभूती

धरणगाव प्रतिनिधी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून धरणगाव येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात यंदा आगळ्यावेगळ्या उपक्रमातून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. नेहमी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी ‘सर-मॅडम’ची भूमिका स्वीकारत विद्यालयाचा संपूर्ण शैक्षणिक कारभार सांभाळला.

विद्यार्थ्यांनी दिवसभर विविध वर्गांमध्ये अध्यापन करण्यासोबतच शिस्त, नियोजन आणि इतर शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडल्या. शिक्षक म्हणून वर्गासमोर उभे राहताना विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, नेतृत्वगुण, वक्तृत्वकौशल्य आणि नियोजन क्षमता प्रकर्षाने दिसून आली.

शिक्षक होणे म्हणजे जबाबदारीची जाणीव

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे होते, तर आदर्श विद्यालयाचे संचालक तथा उपशिक्षक आशिषकुमार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारून वर्गासमोर उभे राहत प्रभावीपणे अध्यापन केले. दिवसभर शिक्षकांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना शिक्षक होणे म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक शिकविणे नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी घेणे आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.

शिक्षक दिनानिमित्त हर्षदा पाटील, लक्ष्मी सपकाळे, रिया देसले, हर्षदा भोई, गोविंदा पाटील व दिव्या गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

उपशिक्षक बाबाजी मासुळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांचे कार्य, शिस्त, संस्कार तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील शिक्षकांची भूमिका याबाबत विचार मांडले.

‘गुरू-शिष्य परंपरा’ जपण्याचे आवाहन

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे यांनी भारतीय गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व स्पष्ट केले. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून ते संस्कार, विश्वास आणि मार्गदर्शनावर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका प्रत्यक्ष अनुभवणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी इयत्ता दहावीतील नैतिक चौधरी, प्रदीप जाधव, गौरव धनगर, वजाहिद पिंजारी, गोविंदा पाटील, केतन पाटील, हर्षल सोनवणे, गणेश भोई, मानव पाटील, गायत्री पाटील, दिव्या झुंझारराव, रूपाली कुंभार, हर्षदा पाटील, राधिका धनगर, नेहा पाटील, दिव्या धनगर, गौरी पवार व चेतना माळी यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षदा पाटील यांनी केले. कीर्ती पाटील व गौरवी माळी यांनी सूत्रसंचालन केले, तर रिया देसले यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी शिक्षकांची भूमिका स्वीकारून ‘शिक्षक होण्याचा प्रत्यक्ष अनुभव’ घेतला आणि कृतीतून शिक्षकांच्या कार्याला मानवंदना दिली. त्यामुळे आदर्श विद्यालयातील हा आगळावेगळा शिक्षक दिन विद्यार्थ्यांसाठी निश्चितच अविस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version