भडगावातून १५० क्विंटल संशयास्पद फोर्टिफाइड तांदळाची वाहतूक; आयशर ट्रक तहसील कार्यालयात जमा
३०० गोण्यांमधील तांदळावर ‘खुल्या बाजारात विक्रीसाठी नाही’चा उल्लेख; बिलांपासून मालाच्या मूळ स्रोतापर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरित
भडगाव प्रतिनिधी | गणेश रावळ
भडगाव शहरातून चाळीसगावकडून पाचोऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका आयशर ट्रकमधून संशयास्पद स्वरूपाचा फोर्टिफाइड तांदूळ वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल व पुरवठा विभागाने ट्रक ताब्यात घेत तो भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला. या कारवाईमुळे १५० क्विंटल तांदळाच्या या व्यवहाराबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास चाळीसगावहून पाचोऱ्याकडे जाणारा एमएच-५२-०१३८ क्रमांकाचा आयशर ट्रक पत्रकारांच्या निदर्शनास आला. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदळाच्या गोण्या असल्याचे दिसून आल्यानंतर वाहन थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चालकाने ट्रक भडगाव शहरातील चाळीसगाव रोडवरून पाचोरा रोडच्या दिशेने पुढे नेल्याने संशय निर्माण झाला.
पत्रकारांनी पाठलाग करून पाचोरा रोडवरील संतोषी माता मंदिराजवळ ट्रक थांबवला. चालकाकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने महसूल व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली.
त्यानंतर नायब तहसीलदार रमेश देवकर, एस. डी. सोनवणे आणि पुरवठा अधिकारी हर्षल भदाणे घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी ट्रकची पाहणी केल्यानंतर तो भडगाव तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आला.
३०० गोण्या, तब्बल १५० क्विंटल तांदूळ
तहसील कार्यालयात ट्रकची झडती घेतली असता प्रत्येकी ५० किलो वजनाच्या सुमारे ३०० गोण्या आढळून आल्या. त्यामुळे एकूण सुमारे १५० क्विंटल तांदूळ असल्याचे समोर आले.
प्रशासनाने या मालाचा पंचनामा करून तांदूळ ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पुढील तपासणीसाठी तांदळाचे नमुने घेण्यात आले असून, प्रयोगशाळेतील तपासणीनंतर तांदळाचा प्रकार, गुणवत्ता तसेच तो कोणत्या शासकीय अथवा अन्य योजनेशी संबंधित आहे, याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
गोण्यांवरील लेबलमुळे संशय अधिक गडद
तांदळाच्या गोण्यांवर ‘फोर्टिफाइड राईस’ असा उल्लेख असून, त्यामध्ये लोह, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी-१२ यांसारखी सूक्ष्म पोषक तत्त्वे असल्याचे नमूद असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे गोण्यांवर ‘खुल्या बाजारात विक्रीसाठी नाही’ असा स्पष्ट उल्लेख असल्याचे दिसून आले. तसेच गोण्यांवर FSSAI क्रमांक 10519006000495 नमूद असल्याने या तांदळाचा नेमका स्रोत आणि त्याचा वापर कोणत्या योजनेसाठी होणार होता, याबाबत अधिकृत तपासणी होणे आवश्यक ठरत आहे.
१५० क्विंटल मालाचे बिल; व्यवहाराची सत्यता तपासण्याचे आव्हान
दरम्यान, ट्रक चालकाकडे काही बिल व कागदपत्रे आढळून आल्याची माहिती आहे. या कागदपत्रांनुसार चोपडा येथील रोहित ट्रेडिंग कंपनीकडून १५० क्विंटल तांदूळ एस. एम. एम. फूड्स प्रोसेसर्स, वरखेडी, ता. पाचोरा यांना विक्री केल्याचे दाखविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, ही कागदपत्रे प्रत्यक्ष व्यवहाराशी संबंधित आहेत का, संबंधित कंपन्यांना अशा प्रकारच्या फोर्टिफाइड तांदळाचा व्यवहार करण्याचा अधिकार आहे का, मालाचा मूळ स्रोत कोणता, वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या व कागदपत्रे होती का, याची शहानिशा होणे गरजेचे आहे.
विशेषतः ‘खुल्या बाजारात विक्रीसाठी नाही’ असा उल्लेख असलेला तांदूळ खासगी बिलांवरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा आणि कोणत्या उद्देशाने वाहतूक केला जात होता, हा प्रश्न या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
दोन दिवस उलटूनही शहानिशेचा प्रश्न
ट्रक तहसील कार्यालयात जमा होऊन दोन दिवस उलटत असतानाही संबंधित बिलांची आणि कागदपत्रांची शहानिशा पूर्ण झाली आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाचा तपास नेमका कोणत्या टप्प्यावर आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
‘हा तांदूळ नेमका कोणाचा?’ नागरिकांचा सवाल
फोर्टिफाइड तांदळाच्या गोण्यांवर ‘खुल्या बाजारात विक्रीसाठी नाही’ असा उल्लेख असताना तो खासगी स्वरूपाच्या बिलांसह वाहतूक होत असल्याचे समोर आल्याने हा तांदूळ नेमका कोणाचा, कोणत्या योजनेसाठी होता आणि तो खासगी वाहतुकीत कसा आला? असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
या प्रकरणात तांदळाच्या नमुन्यांचा प्रयोगशाळा अहवाल, मालाचा मूळ स्रोत, बिलांची सत्यता, संबंधित व्यापारी व प्रक्रिया केंद्राची भूमिका तसेच ट्रकच्या वाहतुकीचा उद्देश यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
पंचनाम्यानंतर पुढे काय? गुन्हा दाखल होणार का?
सध्या ट्रक ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असला तरी पुढील तपासात माल शासकीय योजनेशी संबंधित असल्याचे किंवा त्याची वाहतूक अथवा विक्री नियमबाह्य पद्धतीने झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर काय कारवाई केली जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
तहसीलदार शितल सोलाट यांनी या तांदळाचा नेमका स्रोत तसेच तो रेशन दुकानासाठी आहे की पोषण आहारासाठी, याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नसल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे आता प्रयोगशाळा अहवाल, कागदपत्रांची शहानिशा आणि मालाच्या मूळ स्रोताच्या तपासणीतून या १५० क्विंटल फोर्टिफाइड तांदळाच्या व्यवहाराचे नेमके गौडबंगाल उलगडणार का? याकडे भडगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
