कुऱ्हा हरदो शाळेत विद्यार्थी बनले शिक्षक!
शिक्षक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी सांभाळली कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी, शिक्षकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
कुऱ्हा हरदो : प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुऱ्हा हरदो येथे ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी स्वतः सांभाळत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती, थोर विचारवंत, तत्त्वज्ञानी आणि उत्कृष्ट शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक गजानन कोठाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनीच कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन केले. शाळेतील सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच शब्दसुमनांनी स्वागत केले. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेले आकर्षक लोगो शिक्षकांना भेट म्हणून दिले. याशिवाय प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थ्यांनी ग्रीटिंग कार्ड देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपट आणि शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे आणि गीतांचे सादरीकरण केले.
यावेळी पूजा पाटील हिने हिंदी भाषेत भाषण केले, तर प्रीती कुंभार आणि पायल इंगळे यांनी मराठी भाषेत आपले विचार मांडले. पायल माळी, पल्लवी माळी आणि मुक्ता माळी यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे भावपूर्ण गीत सादर केले.
शिक्षकांसाठी विद्यार्थिनींची अनोखी भेट
इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी सर्व शिक्षकांसाठी सुंदर फोल्डर फाईल तयार केली. या फाईलमध्ये प्रत्येक शिक्षकासाठी शुभेच्छा संदेश लिहिण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या.
शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. पुनम वाघोदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीच्या पल्लवी माळी आणि जोगेश्वरी माळी यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केले. शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक गजानन कोठाळे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या कल्पकतेचे आणि उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्रद्धा कुंभार हिने उपस्थितांचे आभार मानले.
शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी
कार्यक्रमाला केंद्रप्रमुख श्रीमती प्रतिमा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रेडेड मुख्याध्यापक गजानन कोठाळे, पुनम वाघोदे, योगेश बोरोले, छाया बहुरूपे, नितीन लांडे, कुमुदिनी माहुरे आणि डॉ. वैशाली संसारे या सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन शिक्षकांची भूमिका, नियोजन आणि आयोजनाची जबाबदारी सांभाळल्याने ‘विद्यार्थ्यांमध्येच भविष्यातील शिक्षक दडलेला आहे’ हा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून मिळाला.
