Spread the love

गरजू विद्यार्थिनींना शिलाई मशीनचे वाटप; स्वावलंबनाची नवी दिशा

राजकुंवर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; शिक्षणासोबत कौशल्य विकासावर भर

सोयगाव शहर प्रतिनिधी : विजय पगारे

गरजू विद्यार्थिनींना शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने राजकुंवर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जालना संचलित राजकुंवर महाविद्यालय, बनोटी (ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे शिलाई मशीन वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.

विद्यार्थिनींच्या कौशल्याला व्यावसायिक संधीची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांसह सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

शिक्षणासोबत कौशल्य विकासाची गरज

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. भगवानसिंग डोभाळ होते. संस्थेच्या सचिव प्रा. डॉ. संगीता राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख अतिथी म्हणून कन्नड–सोयगाव मतदारसंघाचे माजी आमदार उदयसिंग राजपूत, बनोटी पोलीस स्टेशनचे संजय सिंघल, भाजप तालुकाध्यक्ष सुनील जाधव आणि स्वप्निल सोनवणे उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबत कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शिलाई मशीनच्या माध्यमातून विद्यार्थिनींना घरबसल्या रोजगाराची संधी निर्माण करता येऊ शकते. त्यातून आर्थिक स्वावलंबन साध्य करून भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासोबतच त्यांना आत्मनिर्भरतेची नवी दिशा मिळते, असेही यावेळी सांगण्यात आले.

संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. गजानन परदेशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येतील, अशी ग्वाही दिली.

विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. एस. आर. सोळंके, प्रा. जी. पी. चौतमल, प्रा. एस. एन. सोळंके, प्रा. एस. एन. सोळंके, प्रा. व्ही. आर. कऱ्हाळे, प्रा. बी. डी. खैरनार, प्रा. एस. डी. महाले, प्रा. एन. एल. सोळंके, प्रा. एस. एस. मोहरे, प्रा. बी. व्ही. सोळंके, प्रा. एम. व्ही. साबळे, प्रा. एस. एन. खैरनार आणि प्रा. ए. आर. राजपूत यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी अविनाश कोतकर, चेतन वेहळे आणि ऋतिक कोतकर उपस्थित होते.

महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

गरजू विद्यार्थिनींच्या हातात शिलाई मशीन देत त्यांना कौशल्य, रोजगार आणि स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला. उपस्थितांनी राजकुंवर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version