दूध उत्पादक सक्षम झाला, तरच दूध संघ खऱ्या अर्थाने सक्षम” — पालकमंत्री गुलाबराव पाटील
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन; सात तालुक्यांतील ३२८ दूध संस्थांचा सहभाग, दर तीन महिन्यांनी चेअरमन कार्यशाळेच्या सूचना
जळगाव, प्रतिनिधी | दि. ६ सप्टेंबर
दूध उत्पादक हा दूध संघाचा खरा केंद्रबिंदू असून, दूध उत्पादक सक्षम झाला तरच दूध संघ खऱ्या अर्थाने सक्षम होईल, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कापूस उत्पादकांसाठी ज्याप्रमाणे सीसीआय महत्त्वाची भूमिका बजावते, त्याचप्रमाणे दूध उत्पादकांसाठी सहकारी दूध संघ आणि गावपातळीवरील दूध संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे उत्पन्न वाढविणे, त्यांना योग्य बाजारपेठ व दर मिळवून देणे, शासन व एनडीडीबीच्या विविध योजनांचा लाभ पात्र पशुपालकांपर्यंत पोहोचविणे आणि दूध संकलनासोबतच गुणवत्तेत वाढ करण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने जळगाव येथील यश लॉन्स येथे आयोजित सात तालुक्यांतील दूध उत्पादक संस्थांच्या चेअरमन कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सहकारी संघाला अधिकाधिक दूध देण्याचे आवाहन
दूध व्यवसायामुळे उत्पादकाला नियमित उत्पन्न मिळत असल्याने खाजगी विक्री कमी करून सहकारी दूध संघाला अधिकाधिक दूध देण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांना पशुपालन व दुग्ध व्यवसायाशी अधिक सक्षमपणे जोडण्यासाठी आवश्यक अर्थसहाय्य उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी बँकांनी सहकार्य करावे. कर्ज व अर्थसहाय्याच्या विविध योजनांबाबत बँक अधिकारी आणि दूध उत्पादकांची संयुक्त बैठक दूध संघाने आयोजित करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
पशुधन, गोठा व पशुखाद्यासाठी अर्थसहाय्यावर भर
पशुपालकांना गाय-म्हैस खरेदीसाठी उपलब्ध अनुदान योजनांचा प्रचलित निकषांनुसार लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले.
तसेच पशुधन खरेदी, गोठा, पशुखाद्य आणि दुग्ध व्यवसायासाठी कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँक अधिकारी व दूध उत्पादकांची संयुक्त बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दूध तपासणीसाठी आधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा प्रयत्न करावा, गुणवत्तापूर्ण पशुखाद्याच्या वापराला प्रोत्साहन द्यावे आणि दूध गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
दर तीन महिन्यांनी चेअरमन कार्यशाळा घ्या
नवीन दूध संस्थांच्या प्रस्तावांचा विचार करताना त्या संस्थेमुळे दूध संकलन वाढणार आहे का आणि दूध उत्पादकांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे का, याचा विचार करावा, अशी सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
दूध उत्पादकांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षांचा नियमित आढावा घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी चेअरमन कार्यशाळा घेण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संघाच्या आवश्यक बाबींसाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून शक्य ते सहकार्य करण्याची ग्वाही पालकमंत्री तथा दूध संघाचे संचालक गुलाबराव पाटील यांनी दिली.
सात तालुक्यांतील ३२८ संस्थांचा सहभाग
या कार्यशाळेत जळगाव, धरणगाव, एरंडोल, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि जामनेर या सात तालुक्यांतील तब्बल ३२८ दूध उत्पादक संस्थांचे चेअरमन, सचिव व प्रतिनिधी सहभागी झाले.
प्रतिनिधींनी दूध संकलन, गुणवत्ता, पशुखाद्य, पशुपालन आणि संघाकडून अपेक्षित सुविधांबाबत विविध अडचणी व सूचना मांडल्या. त्यांच्या प्रश्नांना संघाचे कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी उत्तरे देत प्राप्त सूचना व अडचणींवर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
दूध गुणवत्ता सुधारण्यावर भर
संचालक प्रमोद पाटील यांनी खाजगी दूध विक्री कमी करून संघाचे दूध संकलन वाढविण्यासोबतच दुधातील फॅट आणि एसएनएफचे प्रमाण व गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
सालबर्डी संस्थेचे अमोल पाटील आणि कळमसळे संस्थेचे रोहित पाटील यांनी दूध उत्पादकांसाठी संघामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करून संघाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
२२ दूध संस्थांचा सन्मान
उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या तसेच संघाला सातत्याने गुणवत्तापूर्ण दूध पुरवठा करणाऱ्या सुमारे २२ दूध उत्पादक संस्थांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यशाळेस संचालक मधुकर राणे, अरविंद देशमुख, शामलताई झांबरे, छायाताई देवकर, दगडूदादा चौधरी, रमेश पाटील, नितीन चौधरी, प्रमोद पाटील, कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांच्यासह संघाचे अधिकारी, कर्मचारी तसेच दूध संस्थांचे चेअरमन, सचिव व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संकलन विभागाचे व्यवस्थापक जयेश पाटील यांनी केले. दूध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील यांनी आभार मानले.
