Spread the love

महावितरणचा शेतकऱ्यांसोबत विजेचा लपंडाव; रात्रीही वीज गायब!

कृषीपंपांसाठी नियमित वीजपुरवठा मिळत नसल्याचा आरोप; संतप्त भवरखेडेकरांचा मध्यरात्री धरणगाव उड्डाणपुलावर रास्ता रोको

भवरखेडे | प्रतिनिधी : अजय बाविस्कर

भवरखेडे परिसरातील शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा नियमित मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दिवसा वीजपुरवठा होत नाहीच, मात्र रात्रीच्या वेळीदेखील वीज उपलब्ध होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे महावितरणचा शेतकऱ्यांसोबत जणू विजेचा लपंडाव सुरू असल्याची संतप्त भावना शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.

उभ्या पिकांना पाणी कसे द्यायचे?

शेतातील उभ्या पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी कृषीपंपांचा वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. दिवसा वीज उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी रात्रीच्या वीजपुरवठ्यावर अवलंबून राहतात. मात्र रात्रीही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

वीज कधी सुरू होईल, या प्रतीक्षेत शेतकरी रात्रभर जागे राहत असून वीज सुरू होताच मोटार सुरू करण्यासाठी शेताकडे धाव घ्यावी लागते. मात्र अनेकदा प्रतीक्षा करूनही वीज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाया जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उभ्या पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मध्यरात्री महावितरण कार्यालयात धाव

अनियमित वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या भवरखेडे येथील शेतकरी बांधवांनी अर्ध्या रात्री धरणगाव येथील महावितरण कार्यालयात धाव घेतली. यावेळी वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा करून आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र, काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. वीजपुरवठा नेमका कधी सुरू होणार, दिवसा आणि रात्री वीज का उपलब्ध होत नाही, तसेच कृषीपंपांसाठी नियमित वीजपुरवठा कधी मिळणार, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला.

धरणगाव उड्डाणपुलावर रास्ता रोको

महावितरण प्रशासनाच्या कारभाराविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दि. ६ रोजी मध्यरात्री धरणगाव उड्डाणपुलावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी नियमित वीजपुरवठ्याची मागणी करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कृषीपंपासाठी वीज मिळेल या आशेने रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागते. वीज सुरू झाली की तातडीने मोटार सुरू करण्यासाठी शेतात जावे लागते. मात्र अनेकदा वीजच उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.

“दिवसा वीज नाही, रात्रीही नाही; शेती करायची कशी?”

“दिवसा वीज नाही आणि रात्रीही वीजपुरवठा नाही, मग शेतकऱ्यांनी शेती कशी करायची आणि पिकांना पाणी कधी द्यायचे?” असा संतप्त सवाल भवरखेडे येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

भवरखेडे परिसरातील अनेक कुटुंबांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे कृषी वीजपुरवठा अनियमित राहिल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

निश्चित वेळापत्रकानुसार वीजपुरवठ्याची मागणी

भवरखेडे परिसरातील कृषी वीजपुरवठा तातडीने नियमित आणि सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी धरणगाव महावितरण प्रशासनाकडे केली आहे. दिवसा अथवा रात्री निश्चित वेळापत्रकानुसार पुरेसा वीजपुरवठा करावा, वारंवार होणारे वीजखंडित प्रकार थांबवावेत आणि वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांना स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहून त्यांना योग्य व समाधानकारक उत्तरे द्यावीत. उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकऱ्यांच्या संतापात भर घालू नये, अशीही मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा

महावितरण प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन भवरखेडे परिसरातील कृषी वीजपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा शेतकरी अधिक तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशारा संतप्त शेतकरी बांधवांनी दिला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version