Spread the love

दहीहंडी सुरू अन् वर्गखोलीत धामण सापाचा शिरकाव; सर्पमित्राने २० मिनिटांत केला सुरक्षित रेस्क्यू

विद्यार्थी दुसऱ्या वर्गात असल्याने मोठा अनर्थ टळला; सर्पमित्र समाधान गोसावी यांच्या तत्परतेमुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास

बोदवड, प्रतिनिधी : नाडगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या वर्गखोलीत धामण जातीचा साप शिरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, त्याचवेळी शाळेत बाल विद्यार्थ्यांसाठी दहीहंडीचा कार्यक्रम सुरू असल्याने सर्व विद्यार्थी दुसऱ्या वर्गखोलीत उपस्थित होते. त्यामुळे साप शिरलेल्या वर्गात एकही विद्यार्थी नसल्याने संभाव्य दुर्घटना टळली.

झाडावरून पडला अन् थेट वर्गखोलीत शिरला

शाळेच्या वर्गखोलीशेजारी असलेल्या धर्मशाळेसमोरील झाडावरून साप खाली पडला. यावेळी शाळेत पोषण आहार शिजविणाऱ्या वैशाली ताई पाटील यांच्या निदर्शनास साप आला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शाळेतील शिक्षक महेंद्र पाटील, गोवर्धन सर तसेच शेजारील के. जी. पाटील हायस्कूलचे शिक्षक अंकित पाटील, कल्याण पाटील आणि कर्मचारी अनिल पौळ, सुरेश प्रजापती व नरेंद्रसिंग पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मात्र, तोपर्यंत साप वर्गखोलीत शिरला होता. त्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ धावपळ उडाली.

दहीहंडीमुळे विद्यार्थी दुसऱ्या वर्गात

दरम्यान, शाळेत बाल विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी दुसऱ्या वर्गखोलीत उपस्थित असल्याने साप शिरलेल्या खोलीत कोणताही विद्यार्थी नव्हता.

विद्यार्थी नेमके दुसऱ्या वर्गात असल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे दिसून आले. त्यामुळे शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सर्पमित्राला माहिती; २० मिनिटांत सुरक्षित रेस्क्यू

घटनेची माहिती मिळताच शिक्षक महेंद्र पाटील व अंकित राजपूत यांनी सर्पमित्रांशी संपर्क साधला. दरम्यान, शिवसैनिक अमोल व्यवहारे यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिरसाळा येथील सर्पमित्र समाधान गोसावी यांच्याशी संपर्क साधला.

माहिती मिळताच समाधान गोसावी यांनी वेळ न दवडता नाडगावकडे रवाना होत अवघ्या २० मिनिटांत शाळेत पोहोचून सापाचा सुरक्षितपणे रेस्क्यू केला.

धामण बिनविषारी; सापाला मारू नये

रेस्क्यू करण्यात आलेला साप धामण जातीचा असून तो बिनविषारी असल्याची माहिती सर्पमित्र समाधान गोसावी यांनी दिली.

सापांविषयी असलेल्या गैरसमज आणि अंधश्रद्धेमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होते. त्यामुळे साप आढळल्यास त्याला मारण्याऐवजी तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच, सर्पदंशाची घटना घडल्यास अंधश्रद्धेच्या आहारी न जाता तात्काळ जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार घ्यावेत, असेही त्यांनी सांगितले.

शनिवारी सुट्टीच्या दिवशीही सर्पमित्राची सेवा

सर्पमित्र समाधान गोसावी हे शिरसाळा येथील रहिवासी असून जळगाव एमआयडीसी येथे काम करतात. प्रत्येक शनिवारी सुट्टी घेऊन ते शिरसाळा येथील हनुमान मंदिरात सेवेकरी म्हणून उपस्थित राहत असतात.

नाडगाव येथे साप आढळला त्यावेळी स्थानिक सर्पमित्र बाहेरगावी असल्याने अमोल व्यवहारे यांनी समाधान गोसावी यांना माहिती दिली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने शिरसाळा ते नाडगाव प्रवास करून २० मिनिटांत घटनास्थळी पोहोचत सापाचा सुरक्षित रेस्क्यू केला.

सर्पमित्राच्या तत्परतेमुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दहीहंडीच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थी दुसऱ्या वर्गात असणे आणि त्यानंतर सर्पमित्राने दाखविलेली तत्परता यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version