Spread the love

एसटी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; धुळ्यात आक्रोश मोर्चातून सरकारला इशारा

मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या कनेक्टिंग लिंकला हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर, तर चर्चगेटला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी

धुळे : एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धुळ्यात सकल धनगर समाज आक्रमक झाला असून विविध मागण्यांसाठी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शासनाने धनगर समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाची भूमिका घेतली जात असून, त्याच पार्श्वभूमीवर धुळ्यातही समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

शिवतीर्थ चौकातून मोर्चाला सुरुवात

धुळ्यातील शिवतीर्थ चौकातून धनगर समाजाच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. शिवतीर्थ चौकातून निघालेला मोर्चा सिव्हिल हॉस्पिटल मार्गे क्यूमाईन क्लब येथे पोहोचला. यावेळी समाजबांधवांनी विविध मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले.

मोर्चाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. मोर्चानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

एसटी आरक्षणाच्या मागणीवर ठाम भूमिका

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने ठोस आणि सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष करू नये. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला.

राष्ट्रीय महामार्ग आणि चर्चगेटच्या नामकरणाचीही मागणी

धनगर समाजाच्या वतीने मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या कनेक्टिंग लिंकला हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली. तसेच मुंबईतील चर्चगेट स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.

या मागण्यांमुळे धनगर समाजाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाला योग्य सन्मान मिळेल, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

शासनाने धनगर समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यावर तातडीने निर्णय घ्यावा. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास यापुढे अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मोर्चादरम्यान देण्यात आला.

यावेळी डॉ. प्रकाश मोरे, नगरसेवक अमोल मासुळे, गोपाल माने, अण्णासाहेब खेमनार, कल्पेश सरग, भगवान पाटील, पंडित मदने, माजी नगरसेविका वंदना थोरात, रामदास पाटील, रवींद्र शिरुडे, भूषण शिंदे, योगेश मासुळे, सागर पाकळे, किशोर सरगर, योगेश ठेलारी, पांडुरंग मोरे यांच्यासह धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version