आर.आर. पाडवी नूतन विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
विद्यार्थी शिक्षकांनी घेतली अध्यापनाची जबाबदारी; गुरुजनांचा पेन व गुलाबपुष्प देऊन सन्मान, प्राचार्यांनी केले मार्गदर्शन
धुळे प्रतिनिधी : श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या आर.आर. पाडवी नूतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब श्री. के.जी. गर्दे होते.
यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक श्रीमती पी.व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख श्रीमती के.एन. रवंदळे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. के.जी. गर्दे यांचा सत्कार विद्यार्थी मुख्याध्यापक मच्छिद्र मालचे यांनी केला. तसेच प्राचार्य श्री. गर्दे यांच्या हस्ते विद्यालयातील सर्व गुरुजनांचा पेन व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षकांनी प्राचार्य तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापिकांचा सत्कार केला. माध्यमिक विभागातील विद्यार्थी शिक्षकांचाही कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. के.जी. गर्दे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थी शिक्षकांनी सांगितले अध्यापनाचे अनुभव
शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत अध्यापनाचा अनुभव घेतला. विद्यार्थी मुख्याध्यापक व विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या मनोगतातून अध्यापन करताना आलेले अनुभव कथन केले.
यावेळी शिक्षकांच्या मनोगतातून श्री. एन.एस. पाटील आणि प्रा. श्री. भूषण पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.
प्राचार्यांकडून विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. के.जी. गर्दे यांनी सर्व शिक्षकवृंदाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थी शिक्षकांनी जबाबदारी स्वीकारून केलेल्या अध्यापनाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षक-विद्यार्थी नाते याबाबत त्यांनी अनमोल विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप शेलार यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती सोनाली ठाकरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
