जामनेर तालुक्यात पोलिसांचे पहाटे धडक कॉम्बिंग ऑपरेशन; १८९ आरोपींची तपासणी, ५.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई; १९ दारूबंदीचे गुन्हे दाखल, ५३ संशयित वाहनांची तपासणी
जामनेर (जळगाव) : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने जामनेर तालुक्यात पहाटेच्या सुमारास मोठी धडक कारवाई केली. ७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ३ वाजल्यापासून जामनेर, पहूर आणि फत्तेपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
या मोहिमेदरम्यान एकूण १८९ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली. दारूबंदी कायद्यान्वये १९ गुन्हे दाखल करून तब्बल ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय एका हद्दपार नोटीसची बजावणी करण्यात आली असून ५ अजामीनपात्र वॉरंट (NBW) बजावण्यात आले.
५३ संशयित वाहने पोलिसांच्या रडारवर
कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान ५२ मोटारसायकली आणि एका रिक्षेसह एकूण ५३ संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. या वाहनांची आरटीओ कार्यालयामार्फत पडताळणी सुरू असून, तपासणीत काही अनियमितता आढळल्यास संबंधित वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलीस स्टेशननिहाय कारवाई
जामनेर
- ७२ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी
- १ पाहिजे असलेला आरोपी आढळला
- १ हद्दपार नोटीस बजावली
- दारूबंदी कायद्यान्वये ६ गुन्हे दाखल
- ₹१ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
- १० मोटारसायकली व १ रिक्षेची तपासणी
पहूर
- ६४ आरोपींची तपासणी
- दारूबंदी कायद्यान्वये १० गुन्हे दाखल
- ₹२ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
- २० मोटारसायकलींची तपासणी
- ४ NBW वॉरंट बजावले
फत्तेपूर
- ५३ आरोपींची तपासणी
- दारूबंदी कायद्यान्वये ३ गुन्हे दाखल
- ₹१ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
- २२ मोटारसायकलींची तपासणी
- १ NBW वॉरंट बजावले
१७ अधिकारी, १५० अंमलदार आणि ४ आरसीपी पथकांची धडक
नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा, यासाठी ही व्यापक कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) श्री. अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (पाचोरा विभाग) श्री. बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत एकूण १७ पोलीस अधिकारी, १५० पोलीस अंमलदार आणि ४ आरसीपी पथकांनी सहभाग घेतला.
आगामी काळातही धडक कारवाई सुरूच
सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच अवैध धंदे आणि गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी अशा प्रतिबंधात्मक कारवाया यापुढेही सातत्याने राबविण्यात येतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पहाटेच्या या धडक कॉम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला असून, नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे.
