Spread the love

श्रीनाथ कंटेनर्समध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृती कार्यक्रम

स्थलांतरित कामगारांना संसर्गाचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय व मोफत उपचारांची माहिती; ‘इंटेंसिफाइड कॅम्पेन 3.0’ अंतर्गत उपक्रम

धरणगाव : राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘इंटेंसिफाइड कॅम्पेन 3.0’ अंतर्गत श्रीनाथ कंटेनर्स, जळगाव रोड, धरणगाव येथे एचआयव्ही/एड्स व लैंगिक आजारांबाबत जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथील आयसीटीसी (ICTC) आणि राष्ट्र विकास मायग्रंट टी.आय. प्रोजेक्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ५ सप्टेंबर २०२६ रोजी हा उपक्रम राबविण्यात आला.

श्रीनाथ कंटेनर्समधील पत्री डबी बनविणाऱ्या कारखान्यात काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांना एचआयव्ही/एड्सबाबत शास्त्रीय माहिती देण्यात आली. एचआयव्ही संसर्गाचे विविध मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय, सुरक्षिततेच्या बाबी तसेच शासनाकडून उपलब्ध असलेल्या मोफत उपचार व आरोग्यसेवांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.

बाधित व्यक्तींचे हक्क व कायदेशीर संरक्षण

कार्यक्रमात एचआयव्ही आणि एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एचआयव्ही बाधित व्यक्तींना मिळणारे कायदेशीर संरक्षण, त्यांचे हक्क आणि गोपनीयतेचा अधिकार याबाबतही कामगारांना माहिती देण्यात आली.

बॅनर, पोस्टर तसेच टोल फ्री क्रमांक आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून रिस्क असेसमेंट संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. एचआयव्हीची तपासणी करून घेण्यास इच्छुक कामगारांना त्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

विविध मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास कंपनीचे मालक चेतन कोठारी, व्यवस्थापक योगेश मराठे व राजेंद्र महाजन, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रिजवान शहा, आयसीटीसी समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेश्वर काकडे, राष्ट्र विकास मायग्रंट टी.आय. प्रोजेक्टचे प्रोजेक्ट मॅनेजर अमोल सूर्यवंशी, ओआरडब्ल्यू राहुल सूर्यवंशी यांच्यासह श्रीनाथ कंटेनर्समधील कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.

सर्वांच्या सहकार्यामुळे एचआयव्ही/एड्सविषयी गैरसमज दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम यशस्वी झाला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version