Spread the love

वीजचोरी करणाऱ्यांची नावे-पत्ते होणार सार्वजनिक!

महावितरणचा मोठा निर्णय; वीजचोरीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे संकेत

जळगाव (प्रतिनिधी) शैलेश गुरव : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. वीजचोरी करताना पकडण्यात आलेल्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाईसोबतच त्यांची नावे आणि पत्ते सार्वजनिक करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे वीजचोरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईबरोबरच सामाजिक दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक वीज जोडणीवर बारकाईने लक्ष

वीजचोरी रोखण्यासाठी प्रत्येक वीज जोडणीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश महावितरणकडून देण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान वीजचोरी करताना आढळून आलेल्या संबंधित व्यक्तींविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांचे नाव व पत्ता सार्वजनिक करण्याची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी उच्चस्तरीय बैठकीत यासंदर्भात घोषणा केल्याचे सांगण्यात येत आहे. वीजचोरी हा केवळ आर्थिक गैरप्रकार नसून त्याचा परिणाम नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांवरही होतो. त्यामुळे वीजचोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरणने कठोर भूमिका घेतली आहे.

‘वीजचोरीला आता माफी नाही’

प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी वीजचोरीविरोधात अधिक कडक भूमिका घेण्यात येत आहे. “प्रामाणिक ग्राहकांच्या हक्कासाठी वीजचोरीला आता माफी नाही,” असा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.

महावितरणच्या या कठोर मोहिमेमुळे वीजचोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल आणि नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version