धरणगावात किशोरवयीन विद्यार्थ्यांना एचआयव्ही-एड्सविषयी मार्गदर्शन
गुड शेफर्ड अकॅडमीत जीवन कौशल्य, मानसिक आरोग्य व लैंगिक आरोग्याबाबत जनजागृती; ICTC व साने गुरुजी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
धरणगाव (प्रतिनिधी) प्रशांत शिंदे : राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इंटेंसिफाइड कॅम्पेन 3.0 अंतर्गत गुड शेफर्ड अकॅडमी इंग्लिश स्कूल, धरणगाव येथे किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य, आरोग्य व एचआयव्ही-एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ICTC ग्रामीण रुग्णालय, धरणगाव आणि साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी किशोरावस्था, प्रजननक्षम व लैंगिक आरोग्य, मानसिक आरोग्याच्या समस्या, मादक पदार्थांचा दुरुपयोग तसेच एचआयव्ही-एड्स आणि लैंगिक आजारांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
किशोरावस्थेतील बदलांबाबत शास्त्रीय माहिती
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना किशोरावस्थेत होणारे शारीरिक व मानसिक बदल, प्रजननक्षम व लैंगिक आरोग्य याबाबत शास्त्रीय पद्धतीने माहिती देण्यात आली. एचआयव्ही-एड्सचा संसर्ग होण्याचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय तसेच शासनाकडून उपलब्ध असलेल्या मोफत उपचार व आरोग्यसेवा याविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच एचआयव्ही आणि एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) कायद्याची माहिती देत एचआयव्हीबाधित व्यक्तींना मिळणारे कायदेशीर संरक्षण, त्यांचे हक्क आणि गोपनीयतेचा अधिकार याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.
मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्तीवरही मार्गदर्शन
किशोरवयात निर्माण होणाऱ्या विविध मानसिक आरोग्यविषयक समस्या, त्यावरील उपाय, योग्य समुपदेशनाचे महत्त्व तसेच मादक पदार्थांच्या दुरुपयोगाचे होणारे दुष्परिणाम याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. योग्य माहिती, सकारात्मक विचार आणि जबाबदार वर्तनातून किशोरवयीन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाला मुख्याध्यापिका श्रीमती चैताली राऊतोडे, उपमुख्याध्यापक श्री. जाधव सर, श्रीमती नाजुका भदाणे, श्रीमती भारती तिलक, ICTC विभागाचे समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी, RKS K समुपदेशक गणेश कुंभार, साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेरच्या लिंक वर्कर अश्विनी शिंपी यांच्यासह शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्याने हा जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
