Spread the love

राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणाची कार्यवाही गतिमान करा

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे निर्देश; हलगर्जीपणा करणाऱ्या अभियंत्यांवर विभागीय चौकशी, पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई

परभणी, दि. ८ (प्रतिनिधी रामचंद्र आनंदाते) : सर्वोच्च न्यायालयाने विहित कालमर्यादेत राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश दिले आहेत. या अतिक्रमणांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही अधिक गतिमान करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले.

रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, वाहतूक पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांच्यासह कार्यकारी अभियंता तृप्ती नाग, अनिस खैरदी, गणेश क्षीरसागर, सागर तायडे, अमित उबाळे आदी अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

हलगर्जीपणा करणाऱ्या अभियंत्यांवर विभागीय चौकशी

राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते हद्दीतील अतिक्रमणे तातडीने हटविण्याच्या सूचना देताना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अतिक्रमण हटविण्याच्या कार्यवाहीत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अभियंत्यांविरोधात विभागीय चौकशीच्या नोटिसा बजावण्याचे निर्देश दिले.

अतिक्रमण हटविल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. अतिक्रमणामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्यास संबंधितांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही पोलीस विभागाला देण्यात आल्या.

शासकीय कारवाईत हस्तक्षेप केल्यास कारवाई

अतिक्रमण हटविण्याच्या शासकीय कार्यवाहीत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास नियमानुसार तातडीने कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले.

अतिक्रमण हटविताना वीज जोडणी काढण्याची आवश्यकता भासल्यास संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा कार्यवाहीत समावेश करावा, असेही त्यांनी सांगितले.

सर्व विभागांनी समन्वयाने कारवाई करण्याचे निर्देश

अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने घटनास्थळी उपस्थित राहून कारवाई वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघातांचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version