Spread the love

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते?

चेन्नई वेस्ट झोन पोलिसांची नशिराबादमध्ये चौकशी

नशिराबाद (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या नावाने कथित बनावट Instagram खाते तयार करून त्यावर आक्षेपार्ह स्वरूपाच्या पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी चेन्नई वेस्ट झोन पोलिसांनी नशिराबाद येथील ताज नगर परिसरात राहणाऱ्या एका होमगार्ड जवानाची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात येत असून, तपासासाठी चेन्नई पोलिसांचे पथक नशिराबाद येथे दाखल झाल्याची माहिती आहे.

फॉलोअर्स वाढविण्यासाठी बनावट खाते तयार केल्याचा संशय

नशिराबाद येथील ताज नगर परिसरातील होमगार्ड जवान मोहम्मद जुनेद शेख कुदबुद्दीन याची या प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे. स्वतःच्या सोशल मीडिया खात्यावरील फॉलोअर्स वाढविण्याच्या उद्देशाने संबंधित व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या नावाने कथित बनावट Instagram खाते तयार केले असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या खात्यावर अश्लील तसेच आक्षेपार्ह स्वरूपाच्या पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित राज्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.

आर्थिक व्यवहारांचीही तपासणी

प्रकरणाच्या तपासादरम्यान संबंधित व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात असल्याची माहिती आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीचे बँकेचे पासबुक ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत असून, त्यामध्ये कोणतेही संशयास्पद व्यवहार झाले आहेत का, याची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुढील कारवाईकडे लक्ष

दरम्यान, संबंधित व्यक्तीला जळगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुढील कारवाई नेमकी काय झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

चेन्नई वेस्ट झोन पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, चौकशी आणि तांत्रिक तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तीवरील आरोपांची अंतिम पुष्टी झालेली नसून अधिकृत तपास अहवालाची प्रतीक्षा आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version