Spread the love

नशिराबाद येथे संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी उत्साहात

अभिषेक, सत्यनारायण पूजा व पालखी सोहळ्यासह कीर्तन; गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान समाजबांधवांचा सत्कार

नशिराबाद (प्रतिनिधी) : नशिराबाद येथे संत शिरोमणी श्री सेना महाराजांची पुण्यतिथी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. वरची आळी येथील श्री संत सेना महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नशिराबाद व परिसरातील नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सेना महाराजांच्या मूर्तीचा विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सत्यनारायणाची पूजा श्री चेतन टेमकर यांनी सपत्नीक केली. तसेच पालखी पूजन श्री बाळू ओंकार निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

वारकरी विद्यार्थ्यांचा पालखी सोहळ्यात सहभाग

पालखी सोहळ्यात जळगाव येथील राधाकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पार पडला.

यानंतर ह.भ.प. गोपालजी महाराज दापोरीकर यांचे कीर्तन झाले. कीर्तनातून संत सेना महाराजांच्या कार्याचा व विचारांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान समाजबांधवांचा सत्कार

पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने समाजातील गुणवंत विद्यार्थी, शासकीय सेवेत रुजू झालेले तसेच पदोन्नती मिळविणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला.

शासकीय सेवेत पदोन्नती मिळाल्याबद्दल अजय पंडितराव शिवरामे, मध्य रेल्वेत लोको पायलट म्हणून निवड झाल्याबद्दल रितेश नरेंद्र आमोदकर, तसेच सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. प्रमोद आमोदकर यांचा सत्कार करण्यात आला.

दहावी उत्तीर्ण झालेल्या यश गणेश आमोदकर, मानसी नरेंद्र निकम आणि साहिल रवींद्र गालफाडे, बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंती पुरुषोत्तम टेमकर आणि रागिणी दीपक गालफाडे, तसेच MBA उत्तीर्ण झालेल्या कामिनी अनिल शिवरामे आणि रुपेश नरेंद्र आमोदकर यांचाही गौरव करण्यात आला.

नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार

यावेळी मावळते अध्यक्ष राजेश बळीराम आमोदकर तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक प्रल्हाद गालफाडे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आमोदकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नशिराबाद व परिसरातील समाजबांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version