Spread the love

जटवाडा रोडवर देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणारे दोघे अटकेत

बेगमपुरा पोलिसांची धडक कारवाई; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त, न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) जॉन भालेराव : जटवाडा रोड परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोन तरुणांना बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल असा एकूण ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज अलीम शेख (वय १९, रा. जटवाडा गाव) आणि खान अय्यान नईम खान (वय २१, रा. जफर पार्क, जटवाडा रोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

गॅलेक्सी टर्फ परिसरात पोलिसांची कारवाई

६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.०५ वाजता जटवाडा रोडवरील गॅलेक्सी टर्फ परिसरात पोलिसांनी कारवाई केली. यावेळी अरबाज अलीम शेख याच्याकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि ३ हजार रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

तसेच त्याच्याकडील सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ५३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकशीत दुसऱ्या आरोपीचे नाव समोर

प्राथमिक चौकशीत अरबाज याने सदर पिस्तूल व काडतुसे खान अय्यान नईम खान याने आपल्याकडे दिल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी अय्यान खान यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे १० हजार रुपये किमतीचा Infinix GT मोबाईल जप्त करण्यात आला.

दरम्यान, दोन्ही आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली असता अरबाज शेख याच्या मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये पिस्तूलचे फोटो व व्हिडिओ आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप

या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८१/२०२६ अन्वये कलम ३, २५ भा. ह. का. सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी १९ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप आरोपींवर करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास मपोउपनि. मनीषा केदार करीत आहेत.

पोलिसांच्या पथकाची कामगिरी

पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मारुती मादेवाड, हेड कॉन्स्टेबल उमेश ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश नलवाडे, पोलीस कॉन्स्टेबल जगताप तसेच पीएसआय मनीषा केदार यांनी ही कारवाई केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version