मूर्तिकार राजू घोडके जोपासतायत १९४५ पासूनची मूर्तीकलेची परंपरा
घोडके परिवाराची ८० वर्षांहून अधिक काळाची कलासाधना; आठ ते दहा जिल्ह्यांतून मूर्तींना मागणी
पाचोरा : भुवनेश दुसाने
आधुनिक युगात पारंपरिक कला लोप पावत असताना पाचोरा येथील घोडके परिवाराने सन १९४५ पासून मूर्तीकलेची परंपरा जपली आहे. दिवंगत शंकर गणपत घोडके यांनी सन १९४५ मध्ये हिवरा नदीच्या गाळापासून मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. त्यांच्या कलेचा वारसा आजही पुढील पिढीतील मूर्तिकार राजू घोडके व त्यांचा परिवार समर्थपणे पुढे नेत आहे.
घोडके परिवारातील सुमारे सहा सदस्य एकत्रितपणे गणपती, देवी तसेच विविध महापुरुषांच्या आकर्षक व सुबक मूर्ती साकारतात. त्यांच्या कार्यशाळेत सहा इंचांपासून तब्बल २१ फुटांपर्यंतच्या मूर्ती तयार केल्या जातात. गणेशोत्सव मंडळांसाठी आकर्षक देखावे तसेच विविध ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या हुबेहूब मूर्ती तयार करण्याचे कौशल्यही या परिवाराने जपले आहे.
घोडके यांच्या हातून साकारलेल्या आकर्षक मूर्तींना पाचोरा परिसरासह मनमाड, नाशिक, सटाणा तसेच आठ ते दहा जिल्ह्यांतून मागणी असते. पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक कलाकुसरीचा वापर करून मूर्तींना आकर्षक आणि जिवंत रूप देण्याचे काम राजू घोडके व त्यांचे कुटुंबीय करीत आहेत.
बदलत्या काळातही आपल्या पूर्वजांनी सुरू केलेली मूर्तीकलेची परंपरा जिवंत ठेवत घोडके परिवाराने पाचोऱ्याच्या कलाक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. तब्बल ८० वर्षांहून अधिक काळाची ही परंपरा आजच्या पिढीकडूनही तितक्याच श्रद्धेने आणि मेहनतीने पुढे नेली जात आहे. त्यांच्या या कलासाधनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
