प्रभाग क्रमांक ९ मध्ये ‘एमएसआरटीसी स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
कै. गं. भा. प्रभावती ताई केशव शेठ सोनार बहुउद्देशीय सेवा संस्थेचा उपक्रम; महिला भगिनींसह नागरिकांचा मोठा सहभाग
पाचोरा : भुवनेश दुसाने
पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये कै. गं. भा. प्रभावती ताई केशव शेठ सोनार बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने एमएसआरटीसी स्मार्ट कार्ड नोंदणी कॅम्प मोठ्या उत्साहात पार पडला. या अभियानाला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विशेषतः महिला भगिनींनी स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी मोठी उपस्थिती दर्शविली.
जनसेवक तथा ‘तालुका माझा न्यूज’चे संपादक बंडूभाऊ केशव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांना शासनाच्या विविध सवलती व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच नोंदणीची सुविधा या कॅम्पच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली.
शासकीय योजना थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प
सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि त्यासाठी अनावश्यक धावपळ करावी लागू नये, या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून विविध जनहिताचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापुढेही शासनाच्या विविध योजना थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम संस्थेमार्फत सातत्याने करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पाचोरा शहरातील तसेच प्रभागातील एकही पात्र नागरिक शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. नागरिकांना योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रे तसेच नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध शिबिरे व अभियानांचे आयोजन केले जाणार आहे.
‘योजना प्रत्येक घरापर्यंत’ पोहोचविण्याचा निर्धार
स्मार्ट कार्ड नोंदणी कॅम्पच्या माध्यमातून सुरू झालेला हा जनसेवेचा उपक्रम पुढील काळातही व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. “शासनाच्या योजना जनतेपर्यंत आणि जनतेचा हक्काचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत” पोहोचविण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
शासनाच्या विविध योजना व सवलतींसंदर्भात अधिक माहितीसाठी नागरिकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन कै. गं. भा. प्रभावती ताई केशव शेठ सोनार बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले.
