गोदावरी नदीपात्र कोरडे; पाणीसाठा झपाट्याने घटला
नदीपात्राचा बहुतांश भाग उघडा; पाणीटंचाईची शक्यता वाढली, नदी स्वच्छतेचाही प्रश्न ऐरणीवर
गंगाखेड | प्रतिनिधी – रामचंद्र आनंदाटे : गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात आटल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नदीपात्रातील अनेक भागांत अत्यल्प पाणी शिल्लक राहिले असून, विस्तीर्ण नदीपात्राचा मोठा भाग कोरडा पडला आहे. त्यामुळे आगामी काळात तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिक आणि शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
सध्या नदीच्या विस्तीर्ण पात्रातील बहुतांश भाग उघडा पडलेला असून केवळ काही ठिकाणी अरुंद प्रवाहातून पाणी वाहताना दिसत आहे. नदीपात्रातील घटत्या पाणीसाठ्यामुळे गोदावरीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील गावांसमोर भविष्यातील पाणी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
नदीपात्रात कचऱ्याचे साम्राज्य
पाणीसाठा घटल्याने नदीपात्रातील प्लास्टिकच्या बाटल्या तसेच इतर कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईसोबतच नदी स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पाणी, शेती आणि जनजीवन गोदावरीवर अवलंबून
गोदावरी नदीवर परिसरातील अनेक गावांचे पिण्याचे पाणी, शेती आणि दैनंदिन जनजीवन मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे नदीतील घटता पाणीसाठा हा केवळ पर्यावरणीय प्रश्न नसून नागरिक आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही गंभीर बाब ठरत आहे.
नदीपात्रातील सद्यस्थिती लक्षात घेता प्रशासनाने पाणी संवर्धनाच्या उपाययोजना, नदी स्वच्छता आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
— छायाचित्र : गोदावरी नदीपात्र, गंगाखेड तालुका
