Spread the love

‘योजना विद्यार्थ्यांच्या दारी’; भडगावात समाजकल्याण व बार्टीच्या शैक्षणिक योजनांचा जागर

स्वाधार योजना, वसतिगृह प्रवेश, महाडीबीटी शिष्यवृत्तीची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती; ‘माहितीपासून लाभापर्यंत’ जोडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ

भडगाव : शासनाच्या शैक्षणिक योजनांची माहिती पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने भडगाव तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ‘योजना विद्यार्थ्यांच्या दारी’ हा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लाडकुबाई विद्या मंदिर व दादासाहेब सुपडू मालजी पाटील ज्युनिअर कॉलेज, आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, वसतिगृह प्रवेश प्रक्रिया, समाजकल्याण विभागाच्या विविध शिष्यवृत्ती व शैक्षणिक योजना, महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया तसेच बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. योजनांसाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया तसेच अर्ज भरताना घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

‘माहितीपासून लाभापर्यंत’ विद्यार्थ्यांना जोडणे गरजेचे

समाजकल्याण तथा बार्टीचे भडगाव तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शासनाच्या योजनांचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, “शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आधार देणारी आहे. आर्थिक परिस्थिती, राहण्याची अडचण किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी स्वाधार योजना, वसतिगृह सुविधा, शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक योजनांच्या माध्यमातून शासन मदतीचा हात देत आहे.”

पुढे बोलताना पगारे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ योजनांची माहिती घेऊन थांबू नये, तर पात्रतेनुसार लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करावा. एका विद्यार्थ्याला मिळालेली माहिती त्याच्या मित्रांना, कुटुंबीयांना आणि समाजातील इतर गरजू विद्यार्थ्यांनाही उपयोगी ठरू शकते. त्यामुळे ‘माहितीपासून लाभापर्यंत’ प्रत्येक विद्यार्थ्याला जोडणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

“शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाची संधी गांभीर्याने घेऊन स्वतःचे भविष्य घडवावे आणि समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचा प्रयत्न

हा जनजागृती उपक्रम सहाय्यक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजकल्याण विभागाचे कनिष्ठ लिपिक दीपक दिनेश जोहरे यांच्या समन्वयातून पार पडला.

यावेळी प्रभारी प्रकल्प अधिकारी अर्जुन गायकवाड व समता दूत शांताराम हटकर यांच्यासह सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रा. एच. डी. भैसे, लाडकुबाई विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजचे कार्यवाहक प्रा. एम. पी. पवार, आदर्श कन्या विद्यालयाचे प्राचार्य प्रा. राकेश रोकडे तसेच सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप सोनवणे यांनी उपस्थित राहून उपक्रमाला सहकार्य केले.

विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version