स्पेलिंग बी स्पर्धेत काहूरखेडे शाळेचे सहा विद्यार्थी चमकले; तीन विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड
केंद्रस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश; गायत्री, श्रद्धा आणि चैतालीची पुढील फेरीसाठी निवड
भुसावळ : जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने विनोबा ॲपच्या माध्यमातून आयोजित शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हा अशा चारस्तरीय स्पेलिंग बी (Spelling Bee) स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहूरखेडे, ता. भुसावळ येथील सहा विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विशेष म्हणजे या सहा विद्यार्थ्यांपैकी गायत्री अलकेश पाटील, श्रद्धा ज्ञानेश्वर पाटील आणि चैताली विकास पाटील या तीन विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने विनोबा ॲपच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा केंद्रस्तरावर पार पडला. जिल्हा परिषद केंद्र शाळा वरणगाव येथे झालेल्या केंद्रस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान आणि केंद्रप्रमुख राजेश पाटील यांच्या हस्ते झाले.
“Let the Best Speller Win” आणि “Think, Spell, Succeed” या ब्रीदवाक्यांना सार्थ ठरवत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने स्पर्धेत सहभाग घेतला.
काहूरखेडेच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
केंद्रस्तरीय स्पर्धेच्या अंतिम निकालात काहूरखेडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
- गट १ (इयत्ता १ ली व २ री) — गायत्री अलकेश पाटील प्रथम, हर्षद नीलेश हटकर तृतीय.
- गट २ (इयत्ता ३ री व ४ थी) — श्रद्धा ज्ञानेश्वर पाटील प्रथम, आरुषी उमेश पाटील तृतीय.
- गट ३ (इयत्ता ५ वी व ६ वी) — चैताली विकास पाटील द्वितीय, किर्ती ज्ञानेश्वर पाटील तृतीय.
अशा प्रकारे काहूरखेडे शाळेच्या सहा विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत अव्वल कामगिरी करत शाळेच्या यशात भर घातली.
इतर शाळांतील विद्यार्थ्यांचीही चमकदार कामगिरी
केंद्रस्तरीय स्पर्धेत इतर शाळांतील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
गट १
- प्रथम — गायत्री अलकेश पाटील, जि. प. प्रा. शा. काहूरखेडे
- द्वितीय — भावना दिपक बावस्कर, जि. प. प्रा. शा. अंजनसोंडे
- तृतीय — हर्षद नीलेश हटकर, जि. प. प्रा. शा. काहूरखेडे
गट २
- प्रथम — श्रद्धा ज्ञानेश्वर पाटील, जि. प. प्रा. शा. काहूरखेडे
- द्वितीय — आकांक्षा प्रमोद सुरवाडे, जि. प. प्रा. शा. हतनूर
- तृतीय — आरुषी उमेश पाटील, जि. प. प्रा. शा. काहूरखेडे
गट ३
- प्रथम — दिक्षा राजेंद्र धनगर, जि. प. प्रा. शा. टहाकळी
- द्वितीय — चैताली विकास पाटील, जि. प. प्रा. शा. काहूरखेडे
- तृतीय — किर्ती ज्ञानेश्वर पाटील, जि. प. प्रा. शा. काहूरखेडे
गट ४
- प्रथम — ओम प्रवीण पाटील, जि. प. प्रा. शा. टहाकळी
- द्वितीय — पार्थ राजेंद्र महाजन, जि. प. प्रा. शा. टहाकळी
- तृतीय — पलक विशाल तायडे, जि. प. प्रा. शा. सिद्धेश्वर वरणगाव
केंद्रस्तरीय स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवणारे विद्यार्थी तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. त्यानुसार काहूरखेडे शाळेच्या गायत्री अलकेश पाटील, श्रद्धा ज्ञानेश्वर पाटील आणि चैताली विकास पाटील यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नियोजनासाठी शिक्षकांचे मोलाचे योगदान
स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून ए. के. इंगळे सर (जी. एस. विद्यालय, वरणगाव) आणि एच. एस. पाटील सर (महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव) यांनी अचूक व पारदर्शक मूल्यमापन केले.
उषा तडवी मॅडम यांनी वर्ग व्यवस्थापनाची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. भूषण देशमुख सर यांनी तांत्रिक सहाय्य केले, तर समाधान जाधव सर यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत आणली.
विलास सूर्यवंशी सर यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. ज्योती बेलसरे मॅडम यांनी आकर्षक व सर्जनशील फलक लेखन आणि रेखाटन करून कार्यक्रमस्थळाची शोभा वाढवली.
शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा दिली. विविध शाळांमधून उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच केंद्र शाळेतील सहकारी शिक्षकांच्या सहकार्यामुळे स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बालस्पर्धकांच्या मेहनतीचे आणि उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करण्यात आले. विशेषतः काहूरखेडे शाळेच्या सहा विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक आणि शाळेचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या गायत्री अलकेश पाटील, श्रद्धा ज्ञानेश्वर पाटील आणि चैताली विकास पाटील यांना पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
