ममुराबाद येथे बैलपोळा उत्साहात; सुशील चौधरींच्या बैलांची आकर्षक सजावट ठरली लक्षवेधी
शिंगांवर रंग, मोरपिसे अन् रंगीबेरंगी बाशिंगे; कवड्यांच्या माळा आणि झुलीने सजला सर्जा-राजा
ममुराबाद : शेतकऱ्यांचा पाठीराखा आणि वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पारंपरिक सण बैलपोळा ममुराबाद येथे मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. पोळ्यानिमित्त गावातील बळीराजाने आपल्या लाडक्या बैलांना सजवून त्यांची पूजा-अर्चा केली.
या उत्सवात ममुराबाद येथील शेतकरी सुशील उमाकांत चौधरी यांनी आपल्या बैलांची केलेली आकर्षक सजावट विशेष लक्षवेधी ठरली. त्यांनी बैलांच्या शिंगांना रंग लावून त्यावर मोरपिसे आणि रंगीबेरंगी बाशिंगे सजवली होती. गळ्यात कवड्यांच्या माळा, तर पाठीवर रंगीबेरंगी झूल पांघरल्याने सर्जा-राजाचे रूप अधिकच खुलून दिसत होते.
वर्षभराच्या कष्टांची पोळ्याच्या दिवशी कृतज्ञतेने परतफेड
वर्षाचे ३६५ दिवस शेतात शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या बैलांची पोळ्याच्या दिवशी विशेष पूजा करण्यात आली. सुशील चौधरी यांनी आपल्या बैलांची निगा राखत त्यांची विधिवत पूजा करून गोडधोडाचा नैवेद्य दाखवला.
शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते पोळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
गावात मिरवणुकीने उत्साहाला उधाण
बैलपोळ्यानिमित्त गावात ठिकठिकाणी सजवलेल्या बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. रंगीबेरंगी सजावटीतील बैलजोड्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. सर्जा-राजाच्या सजावटीने आणि पोळ्याच्या उत्साहाने संपूर्ण ममुराबादमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
शेतकरी आणि पशुधनातील प्रेम, कृतज्ञता आणि जिव्हाळ्याची परंपरा जपत ममुराबादचा बैलपोळा उत्साहात पार पडला.
