Spread the love

टाकरखेडा गावात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती

टाकरखेडा | प्रतिनिधी : डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढत असलेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टाकरखेडा येथे सायबर सिक्युरिटी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात नागरिकांना सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, संशयास्पद फोन कॉल, मेसेज, लिंक तसेच ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तातडीने कोणती पावले उचलावीत, याची माहितीही नागरिकांना देण्यात आली.

डिजिटल व्यवहार करताना वैयक्तिक व बँकिंग माहिती कोणालाही शेअर करू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि संशयास्पद संदेश अथवा फोन कॉलला प्रतिसाद देण्यापूर्वी योग्य ती खात्री करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. स्वतःसोबतच कुटुंबातील सदस्यांनाही सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्याचे आवाहन करण्यात आले.

या जनजागृती उपक्रमात स्नेहल पाटील, वैष्णवी पाटील, जय ठाकूर आणि राहुल चोपडे यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले यांचे मार्गदर्शन लाभले.

गावातील नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक माहिती जाणून घेतली. डिजिटल युगात सुरक्षित ऑनलाइन व्यवहारांसाठी अशा जनजागृती उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version