बुऱ्हाणपूर सोलापूर महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाईचा धडाका
शहरातील रस्ते, फुटपाथ आणि चौक मोकळे कधी
मलकापूर प्रतिनिधी –
बुऱ्हाणपूर सोलापूर महामार्गावरील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा पडत असताना आता नगरपरिषद प्रशासनाच्या कारवाईकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासन आक्रमक झाले असेल, तर नगरपरिषद हद्दीतील रस्ते, फुटपाथ, चौक आणि सार्वजनिक जागांवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अतिक्रमणांवर कारवाई कधी होणार? असा थेट सवाल शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि सार्वजनिक जागेचा बेकायदेशीर वापर ही नित्याचीच बाब बनली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला तसेच फुटपाथवर अतिक्रमणे वाढत असतानाही संबंधित प्रशासनाची भूमिका नेमकी काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई आणि नगरपरिषद हद्दीत मात्र मौन, अशी परिस्थिती निर्माण झाली तर ‘आपला तो बाबू, दुसऱ्याचं ते कार्ट’ अशी चर्चा होणे स्वाभाविक आहे. काही निवडक अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, या आरोपांबाबत नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज निर्माण झाली आहे.
महामार्गासाठी एक नियम, शहरासाठी दुसरा?
अतिक्रमण हा अतिक्रमणच असतो. तो महामार्गावर असो अथवा नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावर. मग कारवाईचे निकष वेगवेगळे का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक रस्ते आणि फुटपाथ नागरिकांच्या वापरासाठी आहेत की अतिक्रमणधारकांसाठी, याचे उत्तर प्रशासनाने देणे अपेक्षित आहे.
‘कारवाई करायची तर सरसकट करा!’
अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना कोणताही राजकीय, सामाजिक अथवा इतर दबाव न आणता सर्व अतिक्रमणांवर समान निकषाने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. नगरपरिषद प्रशासनाने शहरातील अतिक्रमणांची व्यापक पाहणी करून रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक जागा तातडीने मोकळ्या कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
महामार्गावरील कारवाईनंतर आता नगरपरिषद प्रशासन शहरातील अतिक्रमणांवरही हातोडा चालवणार का? की अतिक्रमण हटाव मोहीम महामार्गापुरतीच मर्यादित राहणार? या प्रश्नाचे उत्तर आता मलकापूरकरांना नगरपरिषद प्रशासनाकडून हवे आहे.
