Spread the love

साकतचे माजी सरपंच ते भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष; डॉ. भगवानदादा मुरुमकर यांचा यशस्वी राजकीय प्रवास

अहिल्यानगर प्रतिनिधी : बापुसाहेब घोडेस्वार

जामखेड – गेल्या २५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहून तळागाळात सातत्याने काम करणारे ज्येष्ठ नेते आणि जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानदादा मुरुमकर यांची भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून त्यांच्या दीर्घकालीन राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या निवडीमुळे जामखेड तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात नुकताच निवडीचा अधिकृत सोहळा पार पडला. यावेळी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी डॉ. मुरुमकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विविध पदांवर उल्लेखनीय कार्य

डॉ. भगवानदादा मुरुमकर हे जामखेड तालुक्यातील अभ्यासू, अनुभवी आणि संघटनात्मक पकड असलेले नेतृत्व म्हणून परिचित आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविध पदांवर काम करत ग्रामीण भागातील प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.

  • साकतचे सरपंच — ५ वर्षे : सरपंच म्हणून कार्यरत असताना गावातील विविध विकासकामांना चालना देत साकत गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले.
  • पंचायत समिती सदस्य — १० वर्षे : तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रश्न सभागृहात मांडत त्यांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा केला.
  • पंचायत समिती सभापती — ५ वर्षे : सलग पाच वर्षे सभापतीपदाची जबाबदारी सांभाळताना पंचायत समितीच्या कारभारावर आपल्या कार्यपद्धतीचा ठसा उमटवला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी व्यापक व्यासपीठ उभारण्याची अपेक्षा

डॉ. मुरुमकर हे व्यवसायाने पशुवैद्यकीय सेवेत असल्याने त्यांचा शेतकरी आणि ग्रामीण भागाशी जवळचा संबंध आहे. त्यातच पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केल्यामुळे तालुक्यातील विविध गावांशी आणि शेतकरी बांधवांशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे.

सध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणींचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना शासन तसेच पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर प्रभावीपणे मांडून बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. मुरुमकर महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

मान्यवरांची उपस्थिती

मुंबई येथे झालेल्या निवड सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अशोक काका खेडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद दादा काळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अजय दादा काशीद, जामखेड भाजप तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे, माजी उपसभापती रवी दादा सुतवसे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, राहुल चोरगे, भाऊ गरड यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भगवानदादा मुरुमकर यांच्या निवडीबद्दल जामखेड तालुका भाजप तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे ठिकठिकाणी हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version