Spread the love

धरणगावात किशोरवयीन विद्यार्थ्यांना एचआयव्ही-एड्ससह मानसिक व लैंगिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

इंटेंसिफाइड कॅम्पेन 3.0 अंतर्गत जनजागृती कार्यक्रम; किशोरावस्था, जीवन कौशल्ये, व्यसनमुक्ती आणि कायदेशीर हक्कांची दिली माहिती

धरणगाव प्रतिनिधी : प्रशांत शिंदे

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इंटेंसिफाइड कॅम्पेन 3.0 अंतर्गत सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालय, धरणगाव येथे किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य, आरोग्य व एचआयव्ही-एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आय.सी.टी.सी. (ICTC) ग्रामीण रुग्णालय, धरणगाव आणि साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना किशोरावस्था, शारीरिक व मानसिक बदल, प्रजननक्षम व लैंगिक आरोग्य, मानसिक आरोग्याच्या समस्या, मादक पदार्थांचा दुरुपयोग तसेच एचआयव्ही/एड्स याबाबत शास्त्रीय आणि सविस्तर माहिती देण्यात आली. एचआयव्हीचा संसर्ग होण्याचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय तसेच शासनाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या मोफत उपचार व आरोग्यसेवांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यावेळी एचआयव्ही आणि एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, एचआयव्ही बाधित व्यक्तींना मिळणारे कायदेशीर संरक्षण, त्यांचे मूलभूत हक्क आणि गोपनीयतेचा अधिकार याबाबतही विशेष मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक प्रश्नांबाबत योग्य माहिती जाणून घेणे आणि गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. आर. चव्हाण सर, श्री. अहिरराव सर, श्री. सूर्यवंशी सर, श्री. रोकडे सर, ICTC विभागाचे समुपदेशक श्री. ज्ञानेश्वर शिंपी, आरकेएसके समुपदेशक श्री. गणेश कुंभार, साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेरच्या लिंक वर्कर श्रीमती अश्विनी शिंपी, इतर शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळा, आरोग्य विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना किशोरावस्था, आरोग्य, व्यसनमुक्ती आणि एचआयव्ही-एड्सबाबत योग्य व शास्त्रीय माहिती मिळाली. सर्वांच्या सहकार्याने हा जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version