‘झाडं माझ्या मुक्ताईचं’ उपक्रमाचा हरताळे येथून शुभारंभ
योगमाया प्रतिष्ठानच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संकल्प; वर्षभरात ९०५ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, ५०१ विद्यार्थ्यांचा निबंध स्पर्धेत सहभाग
मुक्ताईनगर : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या योगमाया प्रतिष्ठानच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ‘झाडं माझ्या मुक्ताईचं’ या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नूतन माध्यमिक विद्यालय, हरताळे येथून या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून, कडुलिंब, पिंपळ, वड, आंबा, आवळा यांसह विविध औषधी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प प्रतिष्ठानने केला आहे. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांचे संवर्धन आणि संगोपन करण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे.
योगमाया प्रतिष्ठानने आपल्या स्थापनेपासूनच्या पहिल्याच वर्षात विविध समाजाभिमुख उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. प्रतिष्ठानच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त वर्षभरातील सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला. संस्थेची नोंदणी प्रक्रिया देखील यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, वर्षपूर्ती उत्साहात साजरी करण्यात आली.
वर्षभरातील उल्लेखनीय सामाजिक उपक्रम
९०५ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
आदिशक्ती मुक्ताबाई यात्रोत्सव २०२६ निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ९०५ भाविक व रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.
५०१ विद्यार्थ्यांचा निबंध स्पर्धेत सहभाग
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय भव्य निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल ५०१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या लेखणीतून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. यासोबतच शिवतीर्थ येथे पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना सांस्कृतिक अभिवादन करण्यात आले.
परिचारिकांचा ‘उत्कृष्ट सेवा सन्मान’
जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे रुग्णसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला व पुरुष परिचारिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या सेवाभावी कार्याचा प्रतिष्ठानच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आला.
‘एक राखी देश के नाम’ उपक्रमातून जवानांना अभिवादन
रक्षाबंधनानिमित्त तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या हॅन्डमेड राख्या, शुभेच्छापत्रे आणि सैनिकांसाठी पत्रे तयार केली. योगमाया प्रतिष्ठानच्या वतीने या राख्या व पत्रे मिलिटरी स्टेशन, भुसावळ येथे नेऊन देशाच्या जवानांना सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आगामी काळातही समाजहिताचे उपक्रम राबविण्याचा संकल्प
योगमाया प्रतिष्ठानच्या माध्यमातून आगामी काळातही समाजहित, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शिक्षण आणि जनकल्याणाशी संबंधित विविध उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अश्विन सुरवाडे यांच्यासह संकेत कपले, सनत जैन, मयूर पाटील, तेजस सापधरे, मनीष महाजन, अनिल गवते, रूपेश कोळी, विश्वजित देशमुख, प्रवीण राठोड तसेच ११ सदस्यीय मंडळ आणि सर्व सदस्यांचे या सामाजिक कार्यासाठी मोलाचे योगदान लाभत आहे.
योगमाया प्रतिष्ठानच्या पहिल्याच वर्षातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, देशभक्तीपर आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, ‘झाडं माझ्या मुक्ताईचं’ या वृक्षारोपण उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला आणखी व्यापक स्वरूप मिळणार आहे.
