लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार पाच पात्र कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नियुक्ती
पारोळा नगरपरिषदेत नियुक्ती आदेशांचे वाटप; पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार न्याय देण्याचा नगराध्यक्षांचा प्रशासनाला निर्देश
पारोळा / सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील सुधारित कलम ७६, स्थायी निर्देश क्रमांक २३, लाड-पागे समितीच्या शिफारशी तसेच शासन निर्णय दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ मधील सुधारित तरतुदी आणि शासनाच्या प्रचलित नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पारोळा नगरपरिषदेतील पाच पात्र कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
पारोळा नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत लोकनियुक्त नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत बी. पाटील, उपनगराध्यक्ष ॲड. रोहनदादा मोरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, गटनेते, सभापती तसेच नगरपरिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका यांच्या उपस्थितीत नियुक्ती आदेशांचे वाटप करण्यात आले.
प्रलंबित प्रकरणांचा घेतला आढावा
सभेदरम्यान लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने वारसा हक्काने नियुक्तीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. संबंधित पात्र उमेदवारांना शासनाच्या प्रचलित नियम, अटी व पात्रतेनुसार न्याय देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थित सदस्यांनी आपापली मते मांडत पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांचा नियमानुसार तसेच संवेदनशीलतेने विचार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. नियुक्ती प्रक्रिया शासनाच्या मार्गदर्शक सूचना, उपलब्ध पदे, आवश्यक पात्रता आणि संबंधित कायदेशीर तरतुदींचे पालन करून पारदर्शक पद्धतीने राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
पात्र कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्याचे नगराध्यक्षांचे निर्देश
लोकनियुक्त नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत भिकनराव पाटील यांनी सांगितले की, नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्काने नियुक्तीच्या प्रकरणांमध्ये शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून पात्र व्यक्तींना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी.
मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर यांनी सभेस संबंधित प्रकरणांची वस्तुस्थिती, उपलब्ध पदे, पात्रता तसेच शासनाच्या निर्देशांची माहिती दिली.
पाच जणांना नियुक्ती आदेश
लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने वारसा हक्काने नोकरीचे नियुक्ती आदेश पुढील पात्र लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले :
- श्री. तुषार दिलीप बिराडे
- श्री. संदीप अरुण महाजन
- श्री. भरत रामसिंग कराडे
- श्री. आदित्य लक्ष्मण चौधरी
- श्री. सुनील भगवान पाटील
नियुक्ती आदेश मिळाल्याने संबंधित लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी प्रशासन अधिकारी श्रीमती यामिनी लक्ष्मणसा जटे, कार्यालय अधीक्षक अनिल भाऊसाहेब तिदमे, लेखाधिकारी दीपक अशोकराव महाजन, अंतर्गत लेखापरीक्षक सार्थक मोरस्कर, स्थापत्य अभियंता सुमित पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन, सभा अधीक्षक किशोर चौधरी यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
