सार्वजनिक बांधकाम विभागाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार इंजि. सचिन तायडे यांना जाहीर
उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, प्रशासकीय कार्यक्षमता व कर्तव्यनिष्ठेची महाराष्ट्र शासनाकडून दखल; शेतरस्ते, रस्ते-पूल व शासकीय इमारतींच्या कामांना दिली गती
मलकापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरवर्षी प्रदान करण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार सन २०२५-२०२६ या कालावधीसाठी जाहीर झाला आहे. तांत्रिक संवर्गातील (स्थापत्य) सहायक अभियंता श्रेणी-१ इंजि. सचिन निवृत्ती तायडे यांना वैयक्तिक उत्कृष्ट सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ११ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यभरात रस्ते, पूल, शासकीय इमारती तसेच विविध पायाभूत सुविधांची कामे केली जातात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तांत्रिक कौशल्य, प्रभावी नियोजन, प्रशासकीय समन्वय आणि कामांची गुणवत्तापूर्ण व वेळेत अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाच्या वतीने उत्कृष्ट सेवा पुरस्काराने गौरव करण्यात येतो.
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १५ सप्टेंबर या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी ‘अभियंता दिन’ साजरा केला जातो. या दिनानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील निवडक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते.
शेतरस्त्यांच्या कामांना दिली गती
मलकापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता श्रेणी-१ इंजि. सचिन निवृत्ती तायडे यांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट तांत्रिक कौशल्यासोबतच प्रशासकीय पकड आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडविले. विशेषतः शेतरस्त्यांच्या कामांचे योग्य नियोजन करून अनेक वर्षांपासून शेतरस्त्यांच्या सुविधेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी मोठा दिलासा दिला.
शेतरस्त्यांची कामे ही तांत्रिकदृष्ट्या किचकट आणि वेळखाऊ असल्याने अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, इंजि. तायडे यांनी शेतरस्त्यांची कामे ही केवळ शासकीय जबाबदारी न मानता शेतकऱ्यांची सेवा म्हणून पाहिली. त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनेक शेतरस्त्यांची कामे पूर्णत्वास नेण्यात आली असून, अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. तसेच काही कामांचे प्रस्तावही प्रक्रियेत आहेत.
रस्ते-पुलांमुळे गावांची जोडणी
इंजि. तायडे यांच्या कार्यकाळात अनेक गावांना रस्ते व पुलांच्या माध्यमातून परस्पर जोडण्याच्या कामांना चालना मिळाली. पूर्वी रस्ते व पुलांच्या अभावामुळे एकमेकांपासून तुटलेल्या अनेक गावांना आता दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वाहतुकीला मोठा फायदा झाला आहे.
शासकीय इमारतींच्या कामांनाही गती
त्यांच्या कार्यक्षेत्रात विविध शासकीय इमारतींच्या बांधकामांनाही गती मिळाली. अनेक इमारतींची कामे पूर्णत्वास गेली असून, काही महत्त्वाची बांधकामे सध्या प्रगतीपथावर आहेत. कामांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्याची शासनाकडून पोचपावती
शेतरस्ते, रस्ते-पूल आणि शासकीय इमारती यांसारख्या विविध विकासकामांमध्ये तांत्रिक गुणवत्ता, नियोजन, प्रशासकीय समन्वय आणि कर्तव्यनिष्ठा यांचा प्रभावी वापर केल्याने इंजि. सचिन तायडे यांच्या कार्याची शासनाने दखल घेतली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेची ही राज्यस्तरीय पुरस्काराच्या रूपाने झालेली पोचपावती मानली जात आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे इंजि. सचिन तायडे यांना राज्यस्तरीय सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी-कर्मचारी, मित्रपरिवार तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
