Spread the love

धुळ्यात उद्योगमंत्री उदय सामंतांना मराठा आंदोलकांचा घेराव

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रश्नांची सरबत्ती; मागण्या सोडविण्याचे उद्योगमंत्र्यांचे आश्वासन

धुळे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनाची धग कायम असतानाच धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांना मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच घेराव घातला. यावेळी आंदोलकांनी विविध मागण्या मांडत सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. उद्योगमंत्री सामंत यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे गेल्या बारा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य होत नसल्याने मराठा समाजातील आंदोलक राज्यभर रस्त्यावर उतरले असून आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबतही आंदोलकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

मराठा आरक्षणाच्या उपसमितीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांचा समावेश असल्याने धुळे जिल्ह्यातील मराठा आंदोलकांनी त्यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलकांनी त्यांना घेराव घालत विविध प्रश्नांवर जाब विचारला. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदनही उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे सुपूर्द केले.

आंदोलकांच्या भावना समजून घेत उद्योगमंत्री सामंत यांनी त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मराठा आंदोलकांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

यावेळी मराठा समाजाचे भानुदास बगदे, विनोद जगताप, निंबा मराठे, उल्हास यादव, अमर फरताडे, श्याम निरगुडे, मनोज ढवळे, हेमंत भडक, भैय्या शिंदे, प्रफुल माने, संतोष लकडे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version