Spread the love

‘१९८० च्या ट्रेंड’ला बळी पडू नका; वैयक्तिक फोटो थर्ड पार्टी अॅपवर अपलोड करण्यापूर्वी सावध राहा

अॅड. चैतन्य भंडारी यांचा नागरिकांना इशारा; फोटोसोबत वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचा प्रश्नही महत्त्वाचा

धुळे : सोशल मीडियावर सध्या ‘१९८० लुक’चे फोटो तयार करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या ट्रेंडमध्ये नागरिक विशेषतः तरुण मंडळी थर्ड पार्टी अॅप्लिकेशनवर स्वतःचे तसेच कुटुंबीयांचे फोटो अपलोड करून ते १९८०च्या दशकातील छायाचित्रांसारखे तयार करून घेत आहेत. मात्र, अशा अॅप्सचा वापर करताना वैयक्तिक माहिती आणि फोटोच्या गोपनीयतेबाबत नागरिकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे आवाहन अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

सध्या सोशल मीडियावर आपला फोटो अपलोड करून ‘हा फोटो १९८०च्या दशकातील फोटोसारखा करून द्या’, अशी मागणी केल्यानंतर संबंधित अॅप्लिकेशन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्या फोटोला जुन्या काळातील लूक देते. त्यामुळे हा ट्रेंड अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आहे.

मात्र, अशा अॅप्लिकेशनवर फोटो अपलोड करताना नागरिकांनी केवळ फोटोच नव्हे, तर आपल्या चेहऱ्याशी संबंधित काही संवेदनशील माहिती तृतीय पक्षाकडे जाण्याची शक्यता लक्षात घेणे आवश्यक आहे. चेहऱ्याची ठेवण, हावभाव आणि अन्य बायोमेट्रिक स्वरूपाची माहिती भविष्यात गैरवापरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता अॅड. भंडारी यांनी व्यक्त केली.

‘फोटो देताना गोपनीयतेचाही विचार करा’

प्रत्येक ट्रेंडचा विचार न करता केवळ सोशल मीडियावर तो लोकप्रिय आहे म्हणून त्याचे अनुकरण करणे योग्य नाही. आपले वैयक्तिक आणि कौटुंबिक फोटो कोणत्या अॅपवर अपलोड करत आहोत, त्या अॅपची विश्वासार्हता काय आहे आणि आपल्या फोटोचा वापर कशासाठी होऊ शकतो, याचा विचार नागरिकांनी करणे गरजेचे आहे.

विशेषतः लहान मुले, कुटुंबीय आणि खासगी स्वरूपाचे फोटो कोणत्याही अनोळखी किंवा अविश्वसनीय थर्ड पार्टी अॅपवर अपलोड करणे टाळावे. सोशल मीडिया ट्रेंडपेक्षा डिजिटल गोपनीयता आणि वैयक्तिक माहितीची सुरक्षितता अधिक महत्त्वाची असल्याचे अॅड. भंडारी यांनी सांगितले.

नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

‘१९८० ट्रेंड’च्या नावाखाली आपले फोटो अनोळखी अॅप्सना देऊन नागरिकांनी आपल्या गोपनीयतेचा धोका वाढवू नये. भविष्यात या माहितीचा गैरवापर होऊन नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी अशा ट्रेंडपासून सावध राहावे आणि आपले तसेच कुटुंबीयांचे फोटो सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version