Spread the love

कर्जत-CSMT लोकल ठरली मैत्रीच्या पार्टीची लोकल; रुपेश पवार यांच्याकडून बदलापूर ग्रुपला समोसा स्नेहभोजन

विजयकुमार पाटील यांच्या संकल्पनेतून धावत्या लोकलमध्ये रंगला मैत्रीचा अनोखा सोहळा

बदलापूर / मुंबई (प्रतिनिधी): मुंबईची ‘लाईफलाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या कर्जत-CSMT लोकलमध्ये शुक्रवारी मैत्रीचा अनोखा आणि आनंददायी सोहळा रंगला. रोजच्या धावपळीच्या आणि गर्दीच्या प्रवासाला विराम देत बदलापूरच्या मित्र परिवाराने धावत्या लोकलमध्येच समोसा स्नेहभोजनाचा आनंद लुटला.

या अनोख्या उपक्रमाची संकल्पना ग्रुपचे सक्रिय सदस्य आणि पत्रकार विजयकुमार पाटील यांची होती. त्यांच्या कल्पनेला प्रतिसाद देत बदलापूरचे सुपरिचित आणि दिलदार व्यक्तिमत्त्व रुपेश पवार यांनी मित्रांसाठी या स्नेहभोजनाचे आयोजन केले.

लोकलच्या प्रवासात रंगली मैत्रीची मैफल

कर्जत-CSMT लोकलने दररोज सकाळी कामानिमित्त प्रवास करणारा हा बदलापूरचा मित्रांचा ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत आला आहे. या मैत्रीचे बंध अधिक घट्ट करण्यासाठी रुपेश पवार यांनी सर्व मित्रांसाठी गरमागरम समोसे, चटणी आणि पाण्याची व्यवस्था केली होती.

लोकल कर्जतहून मार्गस्थ झाल्यानंतर बदलापूर स्थानकाच्या आसपास समोस्याचा सुगंध डब्यात दरवळू लागला. मोबाईलवर गणपतीची गाणी, हातात छोट्या प्लेटमध्ये गरमागरम समोसा, चेहऱ्यावर हास्य आणि मित्रांच्या गप्पा, अशा आनंदी वातावरणात हा प्रवास रंगून गेला. मैत्रीच्या गप्पांमध्ये आणि हास्यविनोदात CSMT कधी आले, हे कुणालाच कळले नाही.

मित्र परिवाराची उत्स्फूर्त उपस्थिती

या समोसा पार्टीमध्ये पत्रकार विजयकुमार पाटील, सुनील, पंकज, राजू भाई, मेडिकल, मधुबन, यश, निखिल, सर्वांचे लाडके मामा, ‘ए.सी.’, बदलापूरचे ‘नाना पाटेकर’ म्हणून प्रसिद्ध असलेले खोपकर, विवेक, माने आदी मित्र सहभागी झाले होते. मात्र, सर्वांचा लाडका विशाल या वेळी गैरहजर होता.

“लोकलने आम्हाला फक्त मुंबईत नेले नाही, तर एकमेकांशी जोडले”

या उपक्रमाबद्दल बोलताना पत्रकार विजयकुमार पाटील म्हणाले, “लोकलने आम्हाला फक्त मुंबईत नेले नाही, तर एकमेकांशी जोडले आहे. रोजचा प्रवास कंटाळवाणा न वाटता आनंददायी व्हावा आणि मित्रांमधील स्नेह अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने हा छोटासा प्रयत्न केला.”

या उपक्रमासाठी रुपेश पवार यांनी सहभागी सर्व मित्रांचे आभार मानले. रोजच्या धावपळीच्या जीवनात काही क्षण आनंदाचे, मैत्रीचे आणि आपुलकीचे निर्माण करणारा हा उपक्रम मित्र परिवारासाठी अविस्मरणीय ठरला.

सौजन्य : रुपेश पवार व बदलापूर मित्र परिवार
संकल्पना व विशेष सहकार्य : पत्रकार विजयकुमार पाटील

Share.
Leave A Reply

Exit mobile version