मुख्याध्यापक संघाच्या सदस्यपदी एम. एम. चौधरी सरांची बिनविरोध निवड
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; सर्वोदय हायस्कूल किन्ही येथे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सत्कार
भुसावळ प्रतिनिधी : जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या सदस्यपदी खंडाळा येथील रहिवासी तथा किन्ही येथील सर्वोदय हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. एम. चौधरी सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वोदय हायस्कूल, किन्ही येथील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे एम. एम. चौधरी सर यांची कार्यतत्परता, शैक्षणिक बांधिलकी आणि शिक्षक व विद्यार्थ्यांप्रती असलेली सकारात्मक भूमिका यांची दखल घेत त्यांच्यावर मुख्याध्यापक संघाच्या सदस्यपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यास प्राधान्य देणार असल्याचा विश्वास चौधरी सर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
त्यांच्या निवडीबद्दल सर्वोदय हायस्कूल, किन्ही येथील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाचा आणि अनुभवाचा मुख्याध्यापक संघाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
