Spread the love

धुळ्यात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव; नागरिकांच्या जीविताला धोका!

उपाययोजना करा, अन्यथा मनपाच्या आवारातच मोकाट कुत्रे सोडणार; स्वाभिमानी क्रांती सेनेचा इशारा

धुळे (प्रतिनिधी) : धुळे शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या भीतीमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन शहरातून वावरावे लागत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी क्रांती सेनेने महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

मोकाट कुत्र्यांवर तातडीने प्रभावी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा शहरातील मोकाट कुत्रे महापालिकेच्या आवारातच सोडण्यात येतील, असा इशारा स्वाभिमानी क्रांती सेनेचे संस्थापक ॲड. संतोष जाधव यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिल्याचे संघटनेने सांगितले.

बालकांवर हल्ल्यांच्या घटनांनी चिंता वाढली

धुळे शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांनी नागरिकांसह बालकांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाने कायमस्वरूपी व प्रभावी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मनपा प्रशासनाकडून निर्बीजीकरणाची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, ही प्रक्रिया अपेक्षित परिणामकारक ठरली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

निर्बीजीकरणासह अँटी रेबीज लसीकरणाची मागणी

स्वाभिमानी क्रांती सेनेच्या वतीने मनपा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये शहरातील प्रत्येक प्रभागात सर्वेक्षण करून मोकाट कुत्र्यांची संख्या निश्चित करणे, प्रभावी निर्बीजीकरण मोहीम राबविणे, अँटी रेबीज लसीकरण करणे, कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांची तातडीने दखल घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करावी, बाजारपेठा, शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, बसस्थानके तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या परिसरात विशेष मोहीम राबवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

“नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड नको”

नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून मनपा प्रशासनाने मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. प्रशासनाने दखल घेतली नाही, तर शहरातील मोकाट कुत्रे महापालिकेच्या आवारात सोडण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी क्रांती सेनेने दिला आहे.

यावेळी स्वाभिमानी क्रांती सेनेचे संस्थापक ॲड. संतोष जाधव, धुळे जिल्हाध्यक्ष किशोर बोरसेसुरेश बैसाणे, जितेंद्र पवार, किशोर मोरे, स्वप्निल कर्डक, अंकित शिरसाट, रघुनाथ खोपे, सुरेश अहिरे, विकास पाटील, कैलास अमृतसागर, विजय कडरे, महिला आघाडीच्या अनिता सोनवणे, सुनिता गोपाळ, नागेश्वरी साळवे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version