Spread the love

दिव्यांग निकिता पाटील यांना निमजाई फाउंडेशनतर्फे पालकमंत्र्यांच्या हस्ते शिलाई मशीन

कौशल्याच्या माध्यमातून स्वावलंबी होण्यासाठी मदतीचा हात

पाळधी : जगात अनेकांच्या वाट्याला विविध प्रकारचे दुःख येते; मात्र आपल्या आयुष्यात जे नाही त्याची खंत करण्यापेक्षा आपल्यातील कला, कौशल्य आणि क्षमतांचा उपयोग करून सकारात्मक बदल घडवून आणणे गरजेचे आहे. कौशल्य विकासाच्या क्षेत्रात अग्रगण्य कार्य करणाऱ्या निमजाई फाउंडेशन आणि सामाजिक सेवाभावी कार्यात सक्रिय असलेल्या मुक्ती फाउंडेशन यांच्या वतीने पाळधी येथील होतकरू व स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या दिव्यांग सौ. निकिता समाधान पाटील यांना मदतीचा हात देण्यात आला.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते निकिता पाटील यांना नुकतीच शिलाई मशीन तसेच मशीनचा संपूर्ण सेट प्रदान करण्यात आला. या मदतीमुळे त्यांना शिवणकामाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होऊन स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.

दिव्यांगत्वावर मात करत स्वतःच्या हिमतीवर पुढे जाण्याची धडपड करणाऱ्या निकिता पाटील यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी फाउंडेशनने हा उपक्रम राबविला. समाजातील गरजू व होतकरू व्यक्तींना कौशल्याच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

यावेळी पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील, अभिजीत पाटील, निमजाई फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शीतलताई पाटील, भूषण राक्षे, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, किशोर पाटील, वैभव निकुंभ, महेश पाटील आदी उपस्थित होते.

निकिता पाटील यांना मिळालेल्या या मदतीमुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी नवी दिशा मिळाली असून, निमजाई फाउंडेशन व मुक्ती फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version