Spread the love

महाभारताची जिवंत साक्ष देणाऱ्या ऋषींसमवेत गणरायाच्या मूर्तीने वेधले धुळेकरांचे लक्ष

पंधरा फुटी गणरायाचा जल्लोषात आगमन सोहळा; राजवर्धन कदमबांडे, अल्पा अग्रवाल, धरती देवरे यांची उपस्थिती

धुळे : महाभारताच्या इतिहासाची जिवंत साक्ष देणाऱ्या ऋषींसमवेत साकारलेल्या गणरायाच्या आगळ्यावेगळ्या मूर्तीने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले. नेताजी ग्राउंड सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने यंदा पंधरा फुटी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, त्याचा आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.

आग्रा रोडवरून ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर गणरायाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’च्या संयोजिका अल्पा अग्रवाल तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे यांनी उपस्थिती लावत मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. आग्रा रोडवरून निघालेली ही मिरवणूक नेताजी ग्राउंड येथे पोहोचून संपन्न झाली.

गेल्या तीन वर्षांपासून नेताजी ग्राउंड सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदा मंडळाने महाभारताचा इतिहास अधोरेखित करणारी गणरायाची विशेष मूर्ती साकारली आहे. ऋषींसमवेत असलेल्या या आकर्षक मूर्तीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य मिळावे, या उद्देशाने मंडळाने यंदा गणरायाचे आगमन दोन दिवस आधीच करण्याचा निर्णय घेतला. एकसारखा पोशाख परिधान केलेले कार्यकर्ते, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि पंधरा फुटी आकर्षक गणरायामुळे आगमन सोहळ्याला विशेष रंगत आली.

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत केले. आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे यंदाचा गणेशोत्सव धुळेकरांसाठी विशेष आकर्षणाचा ठरणार असल्याचे चित्र आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version