तरसोद बोगद्याजवळ साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न: १५ दिवसांत तोडगा काढण्याचे निर्देश, अन्यथा आंदोलनाचा इशारा
पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय चर्चा; नशिराबादकरांच्या त्रासावर कायमस्वरूपी उपाय करण्याचे निर्देश
नशिराबाद | प्रतिनिधी : नशिराबादजवळील तरसोद बोगदा परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या गंभीर समस्येवर अखेर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रश्नावर उच्चस्तरीय चर्चा केली.
तरसोद बोगद्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने दरवर्षी नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. बोगद्यात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी सातत्याने होत आहे.
या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देत १५ दिवसांच्या आत या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, प्रशासनाकडून दिलेली १५ दिवसांची मुदत संपल्यानंतरही प्रश्न मार्गी लागला नाही, तर नशिराबाद नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांनी दिला आहे.
बैठकीदरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कामात काही तांत्रिक अडचणी असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र, शहराच्या विकासात कोणत्याही प्रकारचा अडथळा सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका महाजन यांनी मांडली. समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करताना नगरपरिषद प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आता प्रशासनाने दिलेल्या १५ दिवसांच्या डेडलाईनमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते का आणि तरसोद बोगद्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघतो का, याकडे नशिराबादकरांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने दिलेली मुदत केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कार्यवाहीत उतरावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
