Spread the love

स्वराज्य ग्रुपच्या लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन!

खंडेरावाच्या अवतारातील १५ फुटी गणरायाने वेधले सर्वांचे लक्ष; शिवतीर्थ ते साक्री रोडपर्यंत भक्तिमय वातावरण

धुळे | प्रतिनिधी : ढोल-ताशांचा गजर, गणरायाच्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर आणि भक्तिमय वातावरण अशा उत्साहपूर्ण वातावरणात स्वराज्य ग्रुपच्या लाडक्या गणरायाचे धुळे शहरात जल्लोषात आगमन झाले. यंदा नंदुरबार येथून आणण्यात आलेल्या तब्बल १५ फुटी खंडेरावाच्या अवतारातील गणरायाच्या आकर्षक मूर्तीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

गणेशोत्सवाला अद्याप दोन दिवसांचा अवकाश असतानाच स्वराज्य ग्रुपच्या वतीने बाप्पाचे आगमन करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास शिवतीर्थ परिसरात महाआरती करून गणरायाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवतीर्थाहून निघालेली ही भव्य मिरवणूक साक्री रोडमार्गे पुढे जात महिंदळे शिवारा परिसरात उत्साहात संपन्न झाली.

मिरवणुकीदरम्यान गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषांनी परिसर दणाणून सोडला. आकर्षक गणेशमूर्ती, शिस्तबद्ध मिरवणूक आणि गणरायाच्या भक्तिगीतांमुळे संपूर्ण परिसरात उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

२५ वर्षांची परंपरा कायम

साक्री रोड परिसरातील स्वराज्य ग्रुप गेल्या २५ वर्षांपासून मोठ्या थाटामाटात गणरायाचे आगमन करत आहे. यंदाही ही परंपरा कायम ठेवत मंडळाने नंदुरबार येथून खंडेरावाच्या अवतारातील भव्य १५ फुटी गणेशमूर्ती आणली आहे. गणरायाच्या आगमन सोहळ्यासाठी परिसरातील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

बारा दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल

दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वराज्य ग्रुपच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा तब्बल १२ दिवस गणरायाचा मुक्काम असणार असून, या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती स्वराज्य ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या आगमन सोहळ्याप्रसंगी भूषण राजपूत, विकी आढाव, विशाल पाटील, अतुल जिरे, अतुल पाटील, गणेश ढाने, ईश्वर ढाणे, रोहित मराठे, मयूर पाटील, ललित पाटील, दादू सावंत, दिनेश वाल्हे यांच्यासह स्वराज्य ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भव्य मूर्ती, शिस्तबद्ध मिरवणूक आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वराज्य ग्रुपच्या गणरायाचे आगमन सोहळा धुळे शहरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version